क्राईम जगत
हॉटस्पॉट बुलढाणा! महिला व मुली बेपत्ताचा आकडा पोहोचला १३ वर!
एकाच दिवसात पुन्हा ५ जण बेपत्ता; घटनांमागे मानवी तस्करी की प्रेमप्रकरण?

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): गेल्या पाच दिवसांत बुलढाणा जिल्ह्याचे वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. चिखली आणि देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतून १० जण बेपत्ता झाल्याची शाई वाळते न वाळते, तोच जळगाव जामोद, मलकापूर आणि चिखली परिसरातून पुन्हा पाच जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. अविरत सुरू असलेल्या या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लागोपाठ घडणाऱ्या या घटना केवळ “मिसिंग” आहे, की त्यामागे मानवी तस्करीची एखादी मोठी साखळी तर नाही ना?, अशी भीतीही आता व्यक्त होऊ लागली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मलकापूर आणि जळगाव जामोद ही शहरे आता बेपत्ता व्यक्तींचे “हॉटस्पॉट” बनत चालली आहेत. अज्ञात इसमांकडून मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. चिखलीतील खंडाळा मकरध्वज येथून दिपाली जगधने ही महिला तिच्या ७ आणि ५ वर्षांच्या दोन मुलांसह एका संशयास्पद गाडीतून गायब झालेली आहे. सदर गाडीचा चालकही बेपत्ता आहे. देऊळगाव राजा येथील अनिता पिंपळे ही विवाहिता आणि चिखली बस स्थानकावरून मनीषा चोडकर ही तरुणी आईची नजर चुकवून गायब झाल्याची घटना ताजी आहे.
दरम्यान, जळगाव जामोद येथील गौतम नगर परिसरातून पुन्हा एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. केवळ १७ वर्षे ८ महिने वय असलेली प्रियंका विजय वाघ नावाची अल्पवयीन मुलगी ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अचानक गायब झाली. या प्रकरणी अपर्णा रतन रणित यांनी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात नराधमाने प्रियंकाला फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले असून पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे पोलीस भरतीचे स्वप्न रंगवणारी श्वेता संतोष परसणे (वय १८) ही तरुणी देखील गायब झाली आहे. श्वेता ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी मैदानावर गेली होती. खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून सरावाला गेलेली ही तरुणी अंधार पडला तरी घरी परतलीच नाही. या प्रकरणी चिखली पोलिसांनी हरवल्याची नोंद घेत तपास सुरू केला आहे. अशीच एक घटना अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अनचरवाडी येथे देखील समोर आली आहे. अंचरवाडी येथील दिव्या सुभाष परिहार (वय १९ वर्षे) नावाची तरुणी ३१ जानेवारीपासून गायब आहे. आजी-आजोबा घरात असताना ही तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता झाल्याने ग्रामीण भागातील मुलींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
महिला आणि तरुणींपाठोपाठ मलकापूर शहरातून रणवीर गंगासिंग राजपूत (वय २० वर्षे) हा तरुणही बेपत्ता झाला आहे. रणवीर ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ७ च्या सुमारास त्याच्या एमएच-२८-सीव्ही ३०६३ क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलने घराबाहेर पडला होता. तो उद्यापर्यंत घरी परतला नाही. रणवीरने सोबत नेलेला मोबाइल फोन सुरू आहे. मात्र, तो प्रतिसाद देत नसून या प्रकरणी देखील मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. भरवस्तीतून अल्पवयीन मुलींचे अपहरण होत असेल, तर पालकांनी आपल्या लेकींना सुरक्षित कसे समजावे? असा संतप्त सवाल आता विचारला जात असून त्यांच्या मनात धडकी भरली आहे. पोलिसांनी उपरोक्त प्रकरणांमध्ये तपासचक्रे फिरवायला सुरुवात केली असून त्यांच्या लवकरच छडा लावण्यात येईल, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.



