दिनविशेष: बाबामहाराज सातारकर यांची जयंती
१५ लाख लोकांना दिली वारकरी संप्रदायाची दिक्षा

बाबामहाराज सातारकर : (५ फेब्रुवारी १९३६-२६ ऑक्टोबर २०२३) महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह.भ.प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे.
महाराष्ट्राची सत्वधारा असलेल्या वारकरी संप्रदायाचे भूषण, अध्वर्यू हभप बाबामहाराज सातारकर हे विठ्ठल भक्ती व प्रेमबोधाचे अत्यंत रसाळ आणि तेवढेच प्रभावी प्रवक्ते होते. निरूपणकार म्हणून ते ख्यातकीर्त होते. त्यांचे कीर्तन म्हणजे कीर्तन कलेचा पूर्णावतार होता. ज्ञान, भक्ती, प्रेम आणि बोध यांचा अपूर्व प्रयाग संगम होता. त्यांनी अविरतपणे ६० वर्षे सातारकर फडाची धुरा सांभाळत, पंढरीच्या पायी वारीत प्रेमबोधाचे अमृतसिंचन केले. विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरीचे विविध पैलू सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केले. समाजासाठी त्यांनी केलेले हे कार्य अमुल्य आहे. आज त्यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.


