क्राईम जगत
पिंप्रीच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
तब्बल महिनाभरानंतर मर्ग दाखल; आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : खामगाव तालुक्यात येणाऱ्या पिंप्री कोरडे येथील एका ३५ वर्षीय शेतमजूर तरुणाने आपल्या राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला आहे. तरुणाने आत्महत्या का केली?,याचे कारण मात्र समजू शकले नाही.
पिंप्री कोरडे (ता.खामगाव) येथील रहिवासी असलेला विजय जयराम पाखरे (वय ३५ वर्षे) हा तरुण शेतमजुरी करून आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होता. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान त्याने राहत्या घराच्या छताला लावलेल्या लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.
घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. ४ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १९४ नुसार मर्ग दाखल करण्यात आला आहे. नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार विलास साखरे हे करीत आहेत.



