
अजय टप
लोणार (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसांत बेपत्ता होण्याच्या १३ घटना घडल्याने जनमानसात भीतीचे वातावरण पसरले आहे. लोणार पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पुन्हा दोन घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत १३ वर्षाच्या चिमुकलीला मिठाईचे आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत घरातून बाहेर पडलेला मुलगा घरी परतलाच नाही. या दोन्ही घटनामुळे लोणार तालुक्यात खळबळ उडाली आहे.
लोणारमधून १३ वर्षीय बालिकेचे अपहरण
उल्कानगरी म्हणून जगविख्यात असलेल्या लोणार शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या दिपाली सुनील शिंदे (वय २७ वर्षे) यांची १३ वर्षीय भाची आंचल कृष्णा सोळंके हिला अज्ञात इसमाने ३ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० ते ४ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान फूस लावून पळवून नेले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे अज्ञात आरोपीने पीडित मुलीला काहीतरी खोटेनाटे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. याप्रकरणी दीपाली शिंदे यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास प्रो. पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे ह्या करत आहेत.
फोन वाजतोय,पण उचलत नाही
येवती (ता.लोणार) येथील वैभव शंकर नागरे (वय २५ वर्षे) हा ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा येथे मामाच्या घरी जातो, असे सांगून घरातून निघाला होता. मात्र, तो मामाच्या गावाला पोहोचलाच नाही. आणि घरीही परत आला नाही. या प्रकरणी त्याचे वडील शंकर भागाजी नागरे यांनी लोणार पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. वैभवकडे दोन मोबाइल असून त्यावर संपर्क साधला असता, फोनची रिंग जात आहे. मात्र, वैभवकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. विशेष म्हणजे घरून निघताना तो सोबत १५ हजार रुपये घेऊन गेला होता. त्याची उंची ५ फूट ६ इंच, रंग गोरा, शरीरयष्टी मध्यम असून त्याने राखाडी रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातलेली आहे. तसेच त्याच्या कपाळावर जखमेचा जुनी खूण आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि तरुणांचे अचानक गायब होणे या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे ढग गडद झाले आहेत. पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन सानप हे करीत आहेत. वरील वर्णनाचा कोणताही तरुण किंवा मुलीबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन लोणार पोलिसांनी केले आहे.



