क्राईम जगत
संतापजनक: गाढ झोपेतील महिलेला मारली मिठी
लोणार तालुक्यातील वेणी येथील घटना; मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : दरवाजा नसलेल्या पत्राच्या झोपडीत आपल्या मुलांसमवेत झोपलेल्या एका ३४ वर्षीय महिलेच्या घरात शिरून आरोपीने तिचा विनयभंग केला. महिलेने त्याचा विरोध केला असता, त्याने तिला व तिच्या बहिणीला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना वेणी (ता.लोणार) येथे घडली. या प्रकरणी मेहकर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेणी (ता.लोणार) येथील रहिवासी असलेली ३४ वर्षीय महिला ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२.१५ वाजता दरम्यान तिच्या मुलांसोबत आपल्या टिनपत्राच्या घरात झोपलेली होती. तिच्या घराला दरवाजा नसल्याचे हेरून आरोपी अभिमन्यू वाघमारे (रा.वेणी) हा महिलेच्या घरात घुसला. नव्हेतर गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या शेजारी जाऊन झोपत तिला मिठी मारली. “तू मला आवडतेस, मला तुझ्या जवळ झोपू दे,” असे म्हणत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पीडिता घाबरी आणि तिने जोरजोरात आरडाओरड केली. पीडितेचा आवाज ऐकून तिची बहीण झोपेतून जागी झाली आणि मदतीसाठी तिच्याकडे धावून गेली असता, आरोपीने पीडिता आणि तिच्या बहिणीला हाताचापटाने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने पीडिता व तिच्या बहिणीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडितेने मेहकर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अभिमन्यू वाघमारे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३३३, ७४, ११५ (२), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई हे करीत आहेत.



