क्राईम डायरी: खामगावातून वाहन व मुरूम चोरी
जळगावमध्ये इसमाची आत्महत्या, तर देऊळगाव राजात जिवे मारण्याची धमकी

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस चढतच असल्याचे दिसून येत असून खामगाव शहरात अशोक लेलँड मालवाहू वाहनाची चोरी आणि जप्त केलेल्या शासकीय मुरूमाची पळवापळवी झाल्याची घटना समोर आली. जळगाव जामोदमध्ये एका ४४ वर्षीय व्यक्तीने आपली जीवनयात्रा संपवली. देऊळगाव राजा परिसरात जुन्या वादातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात त्या-त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगाव: खामगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून एक मालवाहू वाहन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेख नदीम शेख नईम यांनी त्यांच्या मालकीचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक एमएच-२८-बीबी-७३३४ हे एमआयडीसी भागातील श्रीनाथ धरमकाटा जवळ उभे केले होते. १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेत सुमारे २ लाख रुपये किमतीचे हे वाहन चोरून नेले. याप्रकरणी शेख नदीम यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश घुगे हे करीत आहेत.
देऊळगाव राजा : सुखदेव सखाराम वाघ (रा.आमखेड) हे जालना येथून आपल्या गावाकडे जात असताना मेव्हणा राजा पाटा परिसरात जुन्या वादाची कुरापत काढून जालना ते देऊळगाव राजा मार्गावर एका व्यक्तीचा थरारक पाठलाग केला. त्याला थांबवून “तुला जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी आरोपी किशोर सावळे, अशोक सावळे आणि दत्ता हाडे यांनी दिली. तसेच अश्लील शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी सुखदेव सखाराम वाघ यांनी देऊळगाव राजा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शरद साळवे हे करत आहेत.
खामगाव : शिरला नेमाने (ता. खामगाव) येथे एक अजब चोरीची घटना समोर आली आहे. महसूल विभागाने जप्त करून पोलीस पाटलांच्या ताब्यात दिलेला २५ ब्रास मुरूम आरोपींनी चोरून नेला. बेकायदेशीर मुरूम उपसा केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रार दिली होती. जप्त केलेला २५ ब्रास मुरूम (किंमत २०,००० रुपये) पोलीस पाटलांच्या संरक्षणात ठेवण्यात आला होता. मात्र, आरोपी शे. मोईनोद्दीन (जेसीबी मालक), सुभाष चौरे आणि एका ट्रॅक्टर मालकाने संगनमत करून हा मुरूम चोरला आणि गावातीलच एका मंदिराच्या मागे नेऊन टाकला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३२४ (३) सह गौण खनिज अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळकृष्ण फुंडकर हे करीत आहेत.
जळगाव जामोद : शहरातील संत रुपलाल नगर येथील रहिवासी किसना सुगदेव कतोरे (वय ४४ वर्षे) यांनी गुरुवारी सकाळी आपल्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घरातील सदस्यांच्या ही बाब निदर्शनास येताच परिसरात खळबळ उडाली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संजय वेरुळकर हे करीत आहेत.



