“त्या”अपघातातील दुसऱ्या जख्मीचा उपचारादरम्यान मृत्यू
सोमवारी दोन दुचाकीची झाली होती समोरासमोर धडक

अजय टप
मलकापुर,(प्रतिनिधी): बुलढाणा रोडवरील निंबारी नजीक असलेल्या राजवीर पेट्रोल पंपासमोर दोन फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू होता. आज ७ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मलकापूर येथे कामाला असलेला शेख जावेद शेख हनीफ (वय ३५ वर्षे) हा दुचाकी क्रमांक एमएच-२८-के-४३९५ ने २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मलकापूर येथून राजुर (ता.बुलढाणा) कडे जात होता. दरम्यान, निंबारी फाट्यानजिक असलेल्या राजवीर पेट्रोल पंपासमोर एमएच-१९-सीएच-६०२ क्रमांकाची दुचाकी दाताळाकडून मलकापूरकडे येत होती. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन या धडकेत राजूर (ता.बुलढाणा) येथील शेख जावेद शेख हनीफ याचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दुचाकीवरील सागर सुधीर झांबरे (वय ३६ वर्षे) रा. मुक्ताईनगर जि.जळगाव खान्देश हा गंभीर जखमी झाला होता. अपघात ग्रस्तांना दाताळा येथील पत्रकार विलास खर्चे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमीला मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गंभीर जखमी सागर सुधीर झांबरे याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव (खां) येथील डाॅ.राजेश जैन यांच्या रुग्णालयात अतीदक्षता विभागात हलविण्यात आले होते. सदर ठिकाणी उपचार सुरू असतांना आज ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सागर झांबरे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तिन वर्षाचा मुलगा, असा आप्त परिवार आहे.



