स्मार्ट बुलढाणा
ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत मोहदरीच्या तरुणाचा मृत्यू
बुलढाणा-चिखली रोडवरील दुर्दैवी घटना

बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा ते चिखली रोडवरील साखळी फाट्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघातात मोहदरी (ता. मेहकर) येथील ३० वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. या घटनेवरून बुलढाण्यातील महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

मोहदरी (ता.मेहकर) येथील रहिवासी असलेला महेश कडुबा लोढे (वय ३० वर्षे) यांची भादोला (ता बुलढाणा) सासुरवाडी आहे. आज ८ फेब्रुवारी रोजी रात्री १.३० वाजता दरम्यान महेश आपल्या सासुरवाडीवरुण स्वतःच्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच-२८-बीक्यू-२४१८ आपल्या गावी मोहदरी येथे परतत होते. त्यावेळी बुलढाणा-चिखली रोडवरील साखळी फाट्या जवळील पुलासमोर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बीआर-०६-जीसी-८४१२ क्रमांकाच्या ट्रकने महेशच्या कारला जबर धडक दिली. या भीषण अपघातात महेश लोढे जागीच ठार झाले. अपघातानंतर माणुसकी दाखवण्याऐवजी आरोपी ट्रक चालक त्याचे वाहन जागेवरच सोडून घटनास्थळावरून पसार झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी महेशचे काका केशव माधवराव लोढे (वय ५० वर्षे) यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १०६, २८१, ३२४ (४), तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विकास सोनुने हे करीत आहेत.



