क्राईम जगत
मलकापूर: हुंड्यासाठी छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर (बुलडाणा): तुझ्या आई वडिलांनी लग्नात दान-दहेज दिले नाही. आता व्यवसाय करण्यासाठी माहेरून १ लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या वडोदरा (गुजरात) येथील पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मलकापूर शहरातील पारपेट भागात राहणाऱ्या तबस्तुमवी मन्सुरबी जुनैद (वय ३२ वर्षे) यांचा विवाह वडोदरा येथील मन्सुरी जुनेद अल्ताफ हुसैन याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच पती, सासू यास्मीन, सासरे अल्ताफ हुसैन आणि नणंद आफिया हे “तुझ्या आईने लग्नात काहीच दिले नाही, तुझ्याशी लग्न करून आम्ही पस्तावलो आहोत, दुसरीकडे लग्न केले असते तर मोठा हुंडा मिळाला असता”, असे म्हणून टोमणे मारू लागले. एवढ्यावरच न थांबता सासूने “तुझ्या पतीला धंदा करण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये, तरच तुला घरात ठेवू, अन्यथा घरात राहू देणार नाही”, अशी धमकी दिली. सततच्या या त्रासाला कंटाळून तबस्तुमवी मन्सुरबी जुनैद ह्या गेल्या चार वर्षांपासून मलकापूर येथे आपल्या माहेरी राहत आहेत. विशेष म्हणजे, ही सोयरीक जुळवून देणारी मध्यस्थ महेराजबी इम्मान पठान ही देखील सासरच्या लोकांना भडकावून त्रास देण्यास मदत करत असल्याचा आरोप तबस्तुमवी मन्सुरबी जुनैद यांनी करत महिला निवारण कक्ष (बुलडाणा) येथे तक्रार दाखल केली होती. मात्र, तिथे कोणतीही तडजोड झाली नाही. आज ना उद्या पती आपल्याला नांदायला घेऊन जातील, याची तबस्तुमवी मन्सुरबी जुनैद यांना होती. मात्र, त्यांचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मलकापूर शहर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुपेश झाल्टे हे करीत आहेत.



