राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोरील डीपी हटवावी

आनंद इंगळे
सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर असलेल्या डीपीमध्ये कोणत्याही क्षणी बिघाड होऊन लख्ख प्रकाश पडतो. अनेकांना याचा त्रास होत आहे. सोबतच जिजाऊ भक्त, शिवभक्त यांची याठिकाणी नियमित वर्दळ असल्याने, तसेच परिसरात भाजीमंडी असल्यामुळे सर्वांच्याच जीवाला मोठा धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने सदर डीपी तत्काळ इतरत्र हलवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, जिजाऊ भक्त व शिवभक्तांनी केली आहे.
अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर जिजाऊ भक्त, शिवभक्त तसेच स्थानिकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. सोबतच या ठिकाणी भाजी मंडी आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी डीपी असणे अत्यंत घातक आहे. भविष्यात या ठिकाणी एखाद्या वेळेस मोठी दुर्घटना होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. राजवाडा परिसर हा ऐतिहासिक वारसा आहे. या परिसरातील वर्दळ पाहता येथे डीपी असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहून शासनाने ही डीपी इतरत्र हलवावी, अशी मागणी जिजाऊ भक्त, शिवभक्त, स्थानिक नागरिकांमधून होत आहे.



