रायपूर येथील सामाजिक सभागृह परिसरात घाणीचे साम्राज्य
स्वच्छतेची जबाबदारी घ्यायला सगळेच सरतात मागं

अभिनय बोर्डे
बुलढाणा,( प्रतिनिधी): तालुक्यातील रायपूर गावात असलेल्या सामाजिक सभागृह (सभामंडप) परिसर सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे अक्षरशः घाणीचे साम्राज्य बनला आहे. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या,उरलेले अन्न व इतर घाण कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. मोकाट जनावरे येथे कचऱ्यावर तुटून पडतात असे चित्र रोज पाहायला मिळते.
या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना या भागातून ये-जा करताना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या सभागृहाच्या आजूबाजूला अशी अवस्था असणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावागावात स्वच्छतेचा आदर्श निर्माण व्हायला हवा असताना रायपूर येथील सभागृह परिसरातली ही स्थिती या योजनेतील अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्या शिलाबाई हिवाळे यांनी या घाणीबाबत ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. सभागृहासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशी अवस्था असणे ही ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने घाण स्वच्छ करावी, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच या परिसरात कचरापेट्या लावून जनजागृती करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.



