स्मार्ट बुलढाणा

अंचरवाडीचा पुल प्रश्न पेटला! ६० दिवसांत ६० शेतकरी करणार आत्महत्या?

जिल्हाधिकाऱ्यांना दिला इशारा

चिखली,(प्रतिनिधी): अंचरवाडी भरोसा रस्त्यावर असलेल्या सावित्री नदीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. १० दिवसांत पुलाचा प्रश्न मार्गी न लागल्यास दररोज १ याप्रमाणे पुढच्या २ महिन्यात ६० शेतकरी आपले जीवन संपवतील. कुणी गळफास घेऊन,कुणी धरणात उडी घेऊन, कुणी विषारी औषध प्राशन करून तर कुणी पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेईल असा इशारा शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

गेल्या पावसाळ्यात अंचरवाडी येथील शेतकऱ्यांनी पुलाच्या प्रश्नासाठी केलेले जलसमाधी आंदोलन जिल्हाभर गाजले होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार मनोज कायंदे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले होते, त्यावेळी १ जून २०२६ पूर्वी पुलाचा प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरु व्हायला अवघे तीन ते चार महिने बाकी असून अद्याप कामाचे भूमिपूजन नाही, काम सुरू झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाचा निर्णय घेतला आहे. पुल नसल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना आठ आठ दिवस गुरांचा चारापाणी करता येत नाही. महिला व मजुरांना महिना महिना शेतात जाता येत नाही, त्यामुळे हाती उत्पन्न येत नाही. त्यामुळे आता जगून काय फायदा असा सवाल शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.२० फेब्रुवारीपासून सामूहिक आत्महत्येचे श्रृंखला आंदोलन सुरू होईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विजय परिहार, संजय परिहार, गोपाल परिहार, भागवत शितोळे, ज्ञानेश्वर परिहार, श्रीकृष्ण परिहार, बालू परिहार यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!