क्राईम जगत

पत्नीने पतीच्या मांडीत खुपसला चाकू

किरकोळ कारणांवरून सांडले रक्त

मोताळा,(प्रतिनिधी): केवळ दूध घेण्याच्या एका क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या २१ वर्षीय पत्नीने आपल्या पतीवर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच सर्वेश्वर नगरमध्ये समोर आली.पवित्र नात्यात संवादाची जागा वादाने घेतली की त्याचे रूपांतर भीषण गुन्ह्यात कसे होते, याचा प्रत्यय या घटनेत आला. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळचे बोरखेड, ह.मु.सर्वेश्वर नगर, वार्ड नंबर १५, मोताळा येथे आपल्या पत्नीसोबत वास्तव्यास असलेला मंगेश आनंदा गवळी (वय ३० वर्षे) हा व्यवसायाने फोटोग्राफर आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास या पती-पत्नीमध्ये दूध घेण्यावरून शाब्दिक चकमक झाली. या चकमकीचे रूपांतर टोकाच्या संतापात झाले आणि रागाच्या भरात आरोपी पत्नी प्रिया मंगेश गवळी (वय २१ वर्षे) हिने घरातील चाकू उचलून थेट मंगेशच्या उजव्या मांडीत खुपसला. या हल्ल्यात मंगेश हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. एवढ्यावरच न थांबता आरोपी प्रियाने त्याला अश्लील शिवीगाळ करत तुला जिवानेच मारून टाकते, अशी धमकी दिली. जखमी अवस्थेत मंगेश गवळी याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आहे.
या प्रकरणी मंगेश गवळी याने ७ फेब्रुवारी रोजी बोराखेडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रिया गवळी हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८, ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!