माणुसकीला काळीमा: मक्याच्या शेतात उचलून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
संग्रामपूर तालुक्यातील खळबळजनक घटना; दोघांविरुद्ध पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शौचास गेलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन नराधमांनी बळजबरीने मक्याच्या शेतात उचलून नेत तिचा विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच संग्रामपूर तालुक्यातील शेवगा बुद्रूक (शेतखेडा) येथे उघडकीस आली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या संतापजनक घटनेप्रकरणी तामगाव पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
शेवगा बुद्रूक (ता.संग्रामपूर) येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहणी पिडीत मुलगी (वय १७ वर्षे) ही ८ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता दरम्यान गावाजवळील पडीत शेतात शौचास गेली होती. संडासचा डब्बा खाली ठेवून बसणार इतक्यात बाजूलाच असलेल्या संदीप सपकाळ यांच्या मक्याच्या शेतात दबा धरून बसलेला आरोपी रोशन संतोष मोहीते (वय १९ वर्षे) आणि विजय शालीग्राम जाधव (वय २० वर्षे) या दोन नराधमांनी अचानकपणे पीडितेवर झडप घातली. यातील आरोपी रोशनने पिडीतेला मागून पकडले. तर विजयने समोरून पकडत “आमच्या सोबत मक्याच्या शेतात चाल,” अशी निर्लज्ज मागणी केली. पिडीतेने त्यांना जाण्यास नकार देत जोरजोरात आरडाओरडा केली असता, आरोपी रोशनने तिचे तोंड दाबून दोघांनीही तिला बळजबरीने उचलून शेतात नेले. तसेच तिला जमिनीवर पाडून तिचा विनयभंग करत छेड काढली. पिडीतेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी “जर कोणाला काही सांगितलेस, तर पुन्हा असेच करू आणि तुला जीवाने मारून टाकू,” अशी धमकी दिली.
या प्रकरणी पीडितेने तामगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७८ (१)(एक), ३५१ (२), ३(५) पोक्सो कायद्याचे कलम ८, १२, अॅट्रॉसिटी कायदाचे कलम ३(१)(डब्लू)(i)(ii), ३(२)(व्हीअ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन हे करीत आहेत.



