क्राईम जगत

सावरगावच्या इसमाचे जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतून अपहरण 

देऊळगाव साकर्षा-पारखेड परिसरातून कोंबले गाडीत; बुलढाणा व अकोला जिल्ह्यात खळबळ

मेहकर, (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देऊळगाव साकर्षा-पारखेड परिसरातून सावरगाव (जि. अकोला) येथील एका ५० वर्षीय मजुराचे ७ फेब्रुवारी रोजी दुपारी पाच ते सहा जणांनी कारमध्ये कोंबून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अपहृत इसमाचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे.

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव (जि. अकोला) येथील रहिवासी असलेले देविदास राठोड आणि पारखेड (ता.मेहकर) रहिवासी असलेल्या एका ऊसतोड एजंटमध्ये पैशांच्या व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. देविदास राठोड यांनी ऊसतोडणीसाठी आगाऊ रक्कम घेतली होती. आणि यावरूनच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी दुपारी देविदास राठोड हे आपल्या कामात असताना एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. या कारमधून पाच ते सहा जण खाली उतरले आणि त्यांनी राठोड यांना बळजबरीने गाडीत कोंबून हवेच्या वेगाने गाडी घेऊन पसार झाले. भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी देविदास राठोड यांच्या पत्नीने ऊसतोड एजंटवर अपहरणाचा आरोप करत चान्नी (जि.अकोला) पोलिसांत तक्रार दिली असून ठाणेदार रवींद्र लांडे हे प्रकरणाची प्राथमिक चौकशी करत असून सदर प्रकरण लवकरच जानेफळ पोलिसांकडे वर्ग करणार आहे. दरम्यान, पारखेड येथील काही स्थानिक रहिवासी आणि पोलिसांचे पथक देविदास राठोड यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!