
मुंबई,( प्रतिनिधी) : चिखली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या रायपूर, सैलानी व भडगाव परिसरातील भारतीय काँग्रेस पक्षाच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत भारतीय जनता पार्टीच्या मुंबई स्थित प्रदेश कार्यालयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला हा प्रवेश राजकीय वर्तुळात भूकंप घडविणारा आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश व राज्यभरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे अनेकजण भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहे. त्यामुळेच की काय चिखली विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून भाजपामध्ये इनकमिंग सुरूच आहे. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली चिखली मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे स्थानिक स्तरावरही पक्षाची ताकद वाढतच आहे.
दरम्यान, आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चिखली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या रायपूर सर्कलमधील सैलानी येथील शेख चांद मुजावर (माजी पंचायत समिती सदस्य), रायपूर येथील मोहम्मद एजाज मोहम्मद मंजूर, शेख असलम मुजावर (ग्रामपंचायत सदस्य), शेख इरफान मुजावर, शेख नई मुजावर, शेख रिजवान, शेख शहजाद मुजावर, शेख फिरोज मुजावर, शेख हुजेब मुजावर व शेख साहेब मुजावर (शेरू) यांनी पक्षप्रवेश केला. भडगाव येथील किशोर संतोषराव साखरे पाटील (माजी पंचायत समिती सदस्य), प्रकाश शांतीराम खडके (ग्रामपंचायत सदस्य) तसेच रायपूर येथील मो.एजाज मो.मंजूर मोहम्मद साबीर मोहम्मद उस्मान (माजी उपसरपंच), शेख भिकन शेख बबलू, सलीम खान हसन खान, शेख कयूम शेख बुडन व मोहम्मद मुशर्रफ मोहम्मद एजाज यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. नामदार बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीचा गमच्या प्रवेश करणाऱ्यांच्या गळ्यात घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार शेताताई महाले यांच्यासह शंकर तरमळे, सरपंच केशव तरमळे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप उगले, माजी सरपंच गणेश साखरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता शेवाळे आणि मंगेश तरमळे यांची उपस्थिती होती. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाबाबत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



