महाराष्ट्र माझा
स्वतःचा जिल्हा कचऱ्यात अन् जपानच्या गप्पा कशासाठी?
करुणा मुंडे यांचा पंकजा पालवे-मुंडे यांना संतप्त सवाल

बीड,(प्रतिनिधी): भाजप नेत्या पंकजा पालवे-मुंडे सध्या जपान दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यावरून “शिवशक्ती” पक्षाच्या प्रमुख करुणा धनंजय मुंडे यांनी कडाडून टीका केली आहे. “बीड जिल्ह्यात ४० वर्षांपासून यांची सत्ता आहे, पण आज बीडची अवस्था कचराकुंडी झाली आहे. जपानला जाण्यापूर्वी पंकजाताईंनी बीडची घाण साफ करावी,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
करुणा मुंडे यांनी म्हटले आहे की, पंकजा मुंडे मोठ्या अभिमानाने घरातील गाईंचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र, बीड जिल्ह्यातील जनावरांची खरी परिस्थिती अत्यंत विदारक आहे. जिल्ह्यातील गाई आणि कुत्र्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी कचराकुंडीतील घाण खावी लागत आहे. गेल्या चार दशकांपासून या घराण्याची सत्ता असूनही बीडमध्ये स्वच्छतेचा आणि कचरा व्यवस्थापनाचा कोणताही विकास झालेला नाही. संपूर्ण जिल्ह्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून सामान्य नागरिकांसह मुक्या जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांच्या जपान दौऱ्याचा समाचार घेताना करुणा मुंडे म्हणाल्या, “जपानमध्ये जाऊन चर्चा करण्यापेक्षा पंकजाताईंनी तेथील लोकांना बीडची खरी परिस्थिती दाखवावी. जो नेता आपल्या जिल्ह्यातील जनावरांना न्याय देऊ शकत नाही, तो जनतेला काय न्याय देणार? पर्यावरण मंत्री म्हणून मिरवणाऱ्यांना बीडच्या बिघडलेल्या पर्यावरणाबद्दल त्यांना जाब कोण विचारणार?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सोबतच “बीडची घाण साफ करायला जपानची गरज नाही, तर इच्छाशक्तीची गरज आहे. जपानच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपल्या अंगणातील कचरा आधी साफ करा,” अशी बोचरी टीका करुणा मुंडे यांनी केली आहे.



