वाशिम

वाशिम जिल्ह्यात आज प्रहारचा एल्गार!

माजी मंत्री बच्चू कडूंच्या उपस्थितीत कारखेड्यात शेतकरी मेळावा

वाशिम,(प्रतिनिधी): शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा आंदोलक चेहरा म्हणून देशभराला परिचित असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आंदोलन सम्राट बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज १२ फेब्रुवारी २०२६ रोजी कारखेडा येथे कार्यकर्ता मेळावा व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमाला शेतकरी शेतमजूर व दिव्यांग बांधवांनी तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

मानोरा तालुक्यात येणाऱ्या कारखेडा येथील शंकरगिरी महाराज संस्थानच्या भव्य प्रांगणात दुपारी १२ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने प्रहारची शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. वाशिम जिल्हा हा प्रामुख्याने कृषीप्रधान जिल्हा असून येथील शेतकऱ्यांसमोर पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि संथ गतीने होणारी कर्जमाफी यांसारखे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या समस्या जाणून घेत पुढील संघर्षाची दिशा ठरवणार आहेत.

भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची विचारधारा तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे, हा देखील या मेळाव्याचा उद्देश आहे. वाशिम जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी या मेळाव्यात विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.

या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रहारचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते, तसेच शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष, वाशिम जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!