खेळ व मनोरंजन
जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धांचा शानदार शुभारंभ
परस्पर समन्वय व सहकार्याने लोकसेवा बळकट करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलढाणा, (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने सुरू होत असलेला हा तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक क्रीडा कौशल्य विकासाबरोबरच परस्पर समन्वय, सांघिक वृत्ती व सहकार्य भावना विकसित करणारा उपक्रम आहे. या माध्यमातून पाच ही जिल्हा परिषदेच्या सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय व सहकार्याने जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या लोकसेवांचे सुद्धा बळकटीकरण करावे, असे आवाहन बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

स्थानीय जिल्हा क्रीडा संकुल येथे आज अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलढाणा या पाच जिल्हा परिषदांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार उद्घाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या उद्घाटन समारंभाप्रसंगी मंचावर विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेचे अपर आयुक्त राजीव फडके , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आबाळे, वाशिमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, अकोल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिहार, अमरावतीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर, आयोजन समितीचे सचिव तथा बुलढाण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले , सतीश देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, वाशिमचे शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, जिल्हा कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल माने, जिल्हा परिषदेचे विविध खातेप्रमुख तसेच सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील म्हणाले की अमरावती विभागातील पाच ही जिल्हा परिषदांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनाची बुलढाणा जिल्ह्यास मिळालेली संधी मैलाचा दगड ठरणार आहे. विभागीय क्रीडा स्पर्धांची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेने या संधीचे सोने केले आहे. प्रशासकीय तणावातून मुक्त होऊन निखळ आनंद देणारी ही पर्वणी असून, यामध्ये सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक क्रीडा व कलाकौशल्यांच्या विकासासाठी सुद्धा ही एक संधी आहे. या माध्यमातून विभाग पातळीवर परस्पर समन्वय, सांघिक वृत्ती व सहकार्य भावनेचा विकास सुद्धा होणार आहे. सोबतच जिल्हा परिषद अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध लोकसेवांच्या बळकटीकरणासाठी सुद्धा हा उपक्रम यशस्वी ठरेल, असा आशावाद डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी येथील उपक्रमशील शाळेचा व विद्यार्थ्यांचा विशेष उल्लेख करून जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याचे कौतुक केले. खेळाडूंना देण्यात आलेल्या शपथेचा संदर्भ घेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात म्हणाले की, शिस्त व सभ्यता या आधारे विभागीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून अमरावती विभाग राज्यात नावलौकिक प्राप्त करेल. विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास शाखेचे अपर आयुक्त राजीव फडके यांनी विभागीय आयुक्तांचा शुभेच्छा संदेश सर्व सहभागी स्पर्धकांना दिला.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आयोजन समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी. दिनांक १२ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत. पार पडणाऱ्या तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली. औपचारिक उद्घाटनापूर्वी उपस्थितांकडून राष्ट्रीय गीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात व मंचावर उपस्थित सर्व जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी अधिकारी तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन करून सर्व खेळाडूंना शपथ देण्यात आली. यावेळी केम्ब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने सादर केलेल्या संगीतमय वातावरणात व आकाशात विविध रंगी फुगे सोडून स्पर्धांचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे व किरण वाघमारे यांनी केले, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे व किरण वाघमारे यांनी केले, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.



