स्मार्ट बुलढाणा

ट्रकने चिरडले! परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

चिखली-बुलढाणा रोडवरील घटना

चिखली,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील महामार्गांवर रस्ता अपघातांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. रोज कुठे ना कुठे एखादा अपघात जिल्ह्यात ठरलेलाच आहे. दरम्यान, बुलढाणा येथे परीक्षेसाठी जाणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणावर आज सकाळी काळाने घाला घातला. या तरुणाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक देत तरुणाला चिरडल्याची हृदयद्रावक घटना चिखली-बुलढाणा मार्गावरील मालगणी फाट्याजवळ घडली. या अपघातात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला झाला.

एकलारा (ता.चिखली) येथील रहिवासी असलेला शंतनू नारायण अंभोरे (वय २१ वर्षे) हा तरुण शिक्षण घेत होता. सध्या परीक्षा सुरू असल्याने आज सकाळी ९.३० वाजता शंतनु आपल्या एमएच-२८-एजी-५४१७ क्रमांकच्या दुचाकीने परीक्षा देण्यासाठी बुलढाणा येथे जात होता. दरम्यान, शंतनु मालगणी फाट्याजवळ पोहोचताच एका भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, शंतनूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे चिखली-बुलढाणा रोडवर काही काळ मोठी वाहतूकची कोंडी निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळ पंचनामा करून शंतनुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.ऐन परीक्षेच्या दिवशीच काळाने शंतनुवर घाला घातल्याने एकलारा गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी ट्रॅक चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!