Uncategorizedस्मार्ट बुलढाणा
धाड: गुम्मी ग्रामपंचायतीचा कारभार आधांतरी
नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित

अभिनय बोर्डे
बुलढाणा,(प्रतिनिधी): तालुक्यातील गुम्मी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सध्या “अंधेरी नगरी” राज सुरू आहे. घरपट्टी व नळपट्टी नियमितपणे वसूल करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला प्रत्यक्षात मात्र, गावकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाणी, स्वच्छता आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा विसर पडला आहे. नागरिकांकडून फक्त ५० टक्केच नळपट्टी व घरपट्टी आकारण्याचा शासननिर्णय आहे. मात्र, येथील ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून पूर्ण नळपट्टी व घरपट्टी वसूल करत असल्याने त्यांच्याकडून शासनाच्या आदेशालाच हरताळ फसल्या जात असल्याची चर्चा आहे.
गुम्मी (ता.बुलढाणा) येथील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर भटकावे लागत आहे. गावातील हँडपंप आहे, मात्र ते बंद अवस्थेत आहे. तर अंतर्गत नळयोजना आणि जलस्रोत दुर्लक्षित अवस्थेत आहेत. परिणामी महिला, वृद्ध आणि लहान मुलांना पाण्यासाठी दररोज तासन्तास भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा बाजूने कचऱ्याचे ढीग पडलेले असून ठीक ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे सर्वत्र पसरत असलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
गावात दर्शनी भागात स्वच्छ भारत अभियानाचा भला मोठा फलक लावण्यात आलेला आहे. कागदोपत्री ग्राम स्वच्छ असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छतेचा मागमूसही या ठिकाणी नसल्याचे चित्र आहे. गावातील मुख्य मार्गावरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. अशा थोर महापुरुषांच्या स्मारकाकडे जाणारा रस्ता घाण, चिखल आणि अंधारात बुडालेला असणे ही अत्यंत दुर्दैवी आणि तेवढीच लाजिरवाणी बाब आहे.
गावातील पथदिवे बंद असल्याने रात्री संपूर्ण गावात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. या अंधारामुळे महिलांना, विद्यार्थ्यांना व कामावरून उशिरा येणाऱ्या मजुरांना भीतीच्या वातावरणात वावरावे लागते. शिवाय चोरी, अपघात व असामाजिक तत्वांचा धोकाही वाढला आहे. गावकऱ्यांनी वारंवार उपरोक्त समस्या सरपंच आणि ग्रामसेवकांच्या निदर्शनात आणून दिल्या मात्र ते याला बगल देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बुलढाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून होत आहे.



