क्राईम जगत

बुलढाण्याच्या अकॅडमीतून २० वर्षीय तरुणी बेपत्ता

महिला व मुलीचे बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोडवर असलेल्या आणि चिंचोले चौक परिसरात येणाऱ्या एका शिकवणी वर्गात क्लासेसाठी गेलेली एक २० वर्षीय तरुणी संशयास्पद रित्या बेपत्ता झाली. ही घटना नुकतीच उघडकीस आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तरुणीच्या आईने बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली असून पोलिसांकडून तरुणीची शोधमोहीम सुरू आहे.
शहरातील शिवशंकरनगर परिसरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहणारी सलोनी सुरेंद्र वानखेडे (वय २० वर्षे) ही तरुणी शहरातीलच चिंचोले चौक परिसरात असलेल्या एका अकॅडमीमध्ये नियमित क्लाससाठी जाते. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे “मी क्लासला जाते”, असे आपल्या आईला सांगून घरातून बाहेर पडली. दुपारी १.३० वाजेपर्यंत घरी परतणे आईला अपेक्षित होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी पोहोचली नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या आईने २ वाजेच्या सुमारास सलोनीच्या मोबाइलवर वारंवार कॉल केले. मात्र, तिचा मोबाइल नंबर बंद आला. तसेच चिंचोले चौक येथील अकॅडमी गाठून सदर ठिकाणी चौकशी केली. मात्र, ती तिथेही मिळून आली नाही. नातेवाईक, तिचे मित्र आणि मैत्रिणींकडेही विचारपूस केली असता, तिचा काहीच पत्ता लागला नाही.
याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरवण्याची नोंद केली आहे. सलोनीची उंची १६० सेमी, रंग सावळा, बांधा सडपातळ, केस काळे असून तिच्या डाव्या कानाचे ऑपरेशन झालेले आहे. तसेच तिने अंगात हिरव्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स पँट घातलेली आहे. पुढील तपास ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार रवींद्र हजारे हे करीत आहेत. बेपत्ता तरुणी बाबत काही माहिती मिळाल्यास बुलढाणा शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात चांगलेच वाढले आहे. कोवळ्या वयात आपल्या जोडीदारांसोबत भविष्याचे स्वप्न रंगवू पाहणाऱ्या तरुणी स्वतःच्याच हाताने स्वतःच्या आयुष्याचे बेरंग करून घेत आहे. आपल्या पाल्यांमध्ये आपलं भविष्य शोधणाऱ्या पालकांसाठी ही चिंतेची बाब असून यावर शासन, प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी सामूहिकरित्या विशेष वर्ग आयोजित करून नवतरुण आणि तरुणींचे समुपदेशन करण्याची गरज आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!