स्मार्ट बुलढाणा

भीषण अपघात: नांदुऱ्याजवळ जेसीबीने दुचाकीला उडवले;

मलकापूरचे निवृत्त कर्मचारी गंभीर; नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी) : मलकापूर-नांदुरा मार्गावर वडनेर भालजी नजीक असलेल्या ठाकूर पेट्रोल पंपाजवळ एका भरधाव जेसीबीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शेषराव नामदेवराव सोनुने (वय ६८ वर्षे) रा. बन्सीलाल नगर, मलकापूर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या अकोला येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अकोला सिव्हिल लाइन पोलिसांनी घेतलेल्या त्यांच्या जबाबावरून नांदुरा पोलिसांनी जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूर येथील बन्सीलालनगरमध्ये राहणारे शेषराव सोनुने हे त्यांची मोटारसायकल क्रमांक एमएच-२८-बीएच-२५४५ ने मलकापूर येथून लांजुळकडे जात होते. प्रवासादरम्यान वडनेर भोलजी शिवारातील ठाकूर पेट्रोल पंपाजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या जेसीबी एमपी-०९-जीएफ-४९७२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अत्यंत भरधाव वेगात आणि निष्काळजीपणाने चालवून सोनुने यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत शेषराव सोनुने यांच्या डोक्याला मागच्या बाजूला गंभीर जखम झाली. तसेच डाव्या पायाच्या गुडघ्याला आणि घोट्याला फ्रॅक्चरसह मोठी दुखापत झाली. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेतून मलकापूर येथील आस्था या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सदर ठिकाणी प्रथम वत्सल हॉस्पिटल आणि ३० जानेवारीपासून डॉ. सोनुने हॉस्पिटल (अकोला) येथे उपचार घेत आहे.

याप्रकरणी अकोला येथील सिव्हिल लाईन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून तो नांदुरा पोलीस स्टेशनला पाठवला. त्यावरून नांदुरा पोलिसांनी जेसीबी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १२५ (ब), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रमोद चिखलकर हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!