क्राईम जगत

तीन अट्टल घरफोड्यांना “एलसीबी”च्या बेड्या

 ६ लाख ८६ लाखांच्या मुद्देमाल जप्त; शेगाव सह अकोल्यातील तीन गुन्ह्यांची उकल

बुलढाणा,(प्रतिनिधी): अमरावती परिक्षेत्रात सध्या क्रमांक एकवर गणल्या जाणाऱ्या बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या कामगिरीचा पुन्हा एकदा झेंडा रोवला. शेगाव शहर आणि परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा या पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, कार आणि मोबाईल असा, एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एवढेच नाही तर, या कारवाईमुळे शेगावसह अकोला जिल्ह्यातील दोन गंभीर गुन्ह्यांचीही उकल झाली, हे विशेष!
मूळचे बरेली (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असलेले धीरजकुमार रामपाल सिंग (वय ३५ वर्षे), सध्या रा. माऊलीनगर (शेगाव) यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि त्यांची हुंडई कार क्रमांक एमएच-४९-सीएच-४९५६ चोरून नेली होती. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांत ८ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. गुप्त खबऱ्याकडून मिळाली माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा परिसरातून राजेंद्र बाबासाहेब राऊत (वय २५ वर्षे) रा. परतूर हा १७ गुन्हे दाखल असलेला आरोपी, राजेश शंकर शर्मा (वय ३० वर्षे) रा. मनमाड, (जि. नाशिक) हा घरफोडी आणि जबरी चोरीचे तब्बल २७ गुन्हे नोंद असलेला आरोपी आणि श्रीराम सोमनाथ सोनवणे (वय २० वर्षे) रा. वैजापूर  (जि.संभाजीनगर) हा ८ मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असलेला आरोपी पथकाने ताब्यात घेतला. उपरोक्त तिन्ही आरोपींची चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे कबुली दिली. नव्हेतर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट आणि टॉप्स (किंमत ६५ हजार रुपये),  हुंडई कार (किंमत ६ लाख रुपये) आणि तीन नाग मोबाइल फोन (किंमत २१ हजार रुपये), एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अकोल्यातील दोन गुन्ह्यांचीही उकल
बेड्या ठोकण्यात आलेल्या या अट्टल चोरट्यांनी शेगावच नव्हे, तर अकोला जिल्ह्यातील डाबकी रोड आणि खदान पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येकी एका घरफोडीची कबुली दिली. त्यामुळे आंतरजिल्हा चोऱ्या करणाऱ्या मोठ्या टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
यांनी बजावली कामगिरी
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा,  अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस अंमलदार दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, गजानन गोरले, निवृत्ती पुंड तसेच तांत्रिक विश्लेषक राजू आडवे, ऋषी खंडेराव यांनी ही धाडसी कामगिरी बजावली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!