क्राईम जगत
मलकापूर हादरले! तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
बैलगाडा शर्यत सरावातील घटना; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरातील गणवाडी रोडवरील गोरक्षण शेत परिसरात बैलगाडा शर्यतीचा सराव सुरू आहे. हा सराव पाहण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणावर किरकोळ वादातून कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर शहरातील सायकल पुरा परिसरात अब्दुल हमीद नावाचा चौक आहे. या परिसरात राहणारा सैयद शहनवाज सैयद नाशीर (वय २१ वर्षे) हा तरुण मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहनवाज सय्यद नाशिर हा गणवाडी रोडवरील मलकापूर भाग ३ मधील गोरक्षण शेतात सुरू असलेला बैलांचा सराव बघण्यासाठी गेले होता. त्याच वेळी आरोपी आकाश (रा.माता महाकालीनगर), गोलू राजपूत (रा. निबारी) आणि एका अनोळखी इसमाचे सदर ठिकाणी दुसऱ्या कोणाशी तरी वाद सुरू होते. सैयद शहनवाज हा सदर ठिकाणी उभा पाहून आरोपींनी “तू इथे का उभा आहेस?”, असे म्हणून विनाकारण त्याला शिवीगाळ केली. “तुम्ही मला शिव्या का देत आहे?”, अशी विचारणा केली असता, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आजी आरोपी गोलू राजपूत याने संतापाच्या भरात त्याच्या जवळील कुऱ्हाडीने शहनवाजवर वार केला. कुऱ्हाडीचा वार शहनवाजच्या डाव्या कानाजवळ लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. एवढ्यावरच न थांबता आरोपी आकाश आणि त्याच्यासोबत असलेल्या “त्या” अनोळखी इसमाने शाहनवाजला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा या ठिकाणी दिसल्यास जीवने ठार मारून टाकण्याची धमकी दिली. सार्वजनिक ठिकाणी आणि तेही भरदिवसा घडलेल्या कुऱ्हाड हल्ल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ वादातून शस्त्र उपसण्याची हे मलकापुरातील पहिलीच घटना नसून वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे गुन्हेगारी वाढल्याची शंका येत आहे.
याप्रकरणी शाहनवाज सय्यद नासीर याने मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे हे करत आहेत.



