क्राईम जगत
संतापजनक: बारा वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार लैंगिक अत्याचार
लिंगपिसाटाच्या वासनेमुळे अल्पवयीन मुलगी गरोदर! जिल्हाभरात संतापाची लाट

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): अंगात हैवान संचारलेल्या एका २२ वर्षीय नराधमाने आपल्या वासनेच्या आहारी जाऊन एका अवघ्या १२ वर्ष ४ महिने वय असलेल्या चिमुकलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. खेळण्या-बागडण्याचे वय असलेल्या या चिमुकलीवर या लिंगपिसाटाने वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केले. माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी ही संतापजनक घटना शेलुद (ता.चिखली) परिसरात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
मूळची रानअंत्री येथील रहिवासी असली पीडित मुलगी ही सध्या शेलूद (ता. चिखली) येथे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. परिस्थिती हलकीची असल्याने तिचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी रोजमजुरी करतात. १५ जून २०२५ रोजी पीडितेचे आई-वडील मजुरीसाठी गेलेले होते. हीच संधी साधून डोंगर खंडाळा येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय आरोपी सागर शेषराव सुरडकर याने या अल्पवयीन मुलीवर आपली वक्रदृष्टी वळवली. पीडिता घरात एकटी असल्याचे पाहून हा नराधम तिच्या घरात शिरला आणि तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच या हैवानाचे मन भरले नाही. त्यामुळे त्याने जेव्हा जेव्हा पीडिता घरात एकटी असेल, तेव्हा तेव्हा तिला धाक दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडले.
नराधमाचे हे कृत्य गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असतानाही भीतीपोटी आणि कोवळ्या वयामुळे पीडितेने ही आपबिती कोणालाही सांगितली नाही. मात्र, नियतीने नराधमाच्या या पापाचा घडा फोडला. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पीडितेच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्याने तिच्या आईने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता, अवघ्या १२ वर्षांची आपली चिमुकली गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे आपल्या लेकीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, नराधम सागर सुरडकरने तिला धमकावून वारंवार केलेल्या अत्याचाराचा पाढा तिने आईसमोर वाचला. घटना ऐकल्यानंतर हतबल झालेल्या मातेने चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिताचे कलम ६४ (२)(एफ), ६४ (२)(एच), ६४(२)(आय), ६४(२)(एम) आणि ६५ (२), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) २०१२ च्या कलम ६, १०, आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, पीएसआय अश्विनी गाडे, पीएसआय शरद भागवतकर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. गुन्हा दाखल झाल्याच्या अवघ्या काही तासांतच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पीडितेची वैद्यकीय चाचणी आणि जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे या करत आहेत.
उद्रेक आणि फाशीची मागणी!
या घटनेमुळे चिखली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. शाळेत जाण्याच्या वयात एका नराधमाने कोवळ्या जिवाला माता होण्याच्या उंबरठ्यावर नेऊन उभे केल्याने अशा नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना भरचौकात फाशी द्यायला हवी, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.



