क्राईम जगत

क्राइम डायरी: संतनगरीत पडला रक्ताचा सडा, तर बीबीमध्ये तुंबळ हाणामारी

अंबोडा येथील महिलेचे घर तोडले; गुळभेळीत गरोदर महिलेचा मृत्यू

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर, ग्रामीण, बीबी आणि जालंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हाणामारीच्या गंभीर घटनांची नोंद झाली. यामध्ये जमिनीचे जुने वाद, शेतीची वाटणी आणि लहान मुलांच्या भांडणातून कोयते, कटर आणि लाठ्या-काठ्यांनी लढाई, अशा घटनांचा समावेश असून एका घटनेत गरोदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांमुळे जिल्हा ढवळून निघाला आहे. गेल्या २४ तासांत घडलेल्या या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.

शेतीची वाटणीवरून बीबीत राडा 

बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंप्री खंदारे (ता.लोणार) येथे शेतीच्या वाटणीवरून कटारे कुटुंबातील दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पिंप्री खंदारे (ता.लोणार) येथील माया सुभाष कटारे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी गजानन कटारे, राजू कटारे आणि इतर ८ ते ९ जणांनी बेकायदेशीर मंडळी जमवून माया व त्यांच्या सासर्‍यांना काठ्यांनी व प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तर याच प्रकरणातील शितल गजानन कटारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शीतल आपल्या पतीसह बाजार करून परत येत असताना, सुभाष कटारे व त्यांच्या साथीदारांनी त्यांना अडवून दगडाने आणि काठीने मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारींवरून बीबी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विवध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

शेतकऱ्यावर हल्ला

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोनगाव येथील शेतकरी ईश्वर काशिनाथ भगत हे शेतात काम करत होते. त्यावेळी आरोपी अरुण डाबेराव आणि त्याच्या पत्नीसह दोन अनोळखी इसम त्यांच्या शेतातील कापलेला हरभरा उचलून नेतांना त्यांना दिसले. ईश्वर भगत यांनी त्यांना हटकले असता, आरोपींनी त्यांच्या सोबत वाद घातला. ईश्वर भगत यांची कॉलर पकडून त्यांना चापटा-बुक्क्यांनी, तसेच लाकडी काठ्यांनी मारहाण करत एकटा दिसलास तर तुला मारून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

शेगावात सांडले रक्त

शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लखपती गल्लीत १३ फेब्रुवारीच्या रात्री ९.३० वाजता जमिनीच्या जुन्या वादातून तुफान हाणामारी झाली. या गल्लीत राहणारे सुमारास विजय राधेशाम शर्मा (वय ६९ वर्षे) हे घरी असताना, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या हर्षल उर्फ शिव शर्मा याने शर्मा यांच्या घरासमोर जाऊन अश्लील शिवीगाळ सुरू केली. शर्मा यांचा मुलगा कृष्णकुमार आणि पत्नी भांडण सोडवण्यासाठी घराबाहेर पडले असता, आरोपी हर्षल याने त्याच्या हातातील लोखंडी कटरने शर्मा यांच्या पत्नीवर वार केले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. तर आरोपी सपना शर्मा हिने शर्मा यांच्या पत्नीचे केस ओढून त्यांना मारहाण केली. तुम्ही जागेच्या कागदपत्रावर सही का करत नाही?, तुम्हाला जिवंत मारून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी विजय शर्मा यांनी शेगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हर्षल शर्मा आणि सपना शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार घट्टे हे करत आहेत.

गरोदर महिलेचा मृत्यू

गुलभेली (ता. मोताळा) येथील रहिवासी भारती योगेश राठोड (वय २५ वर्षे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भारती राठोड यांना गर्भाशयाबाहेर गर्भधारणा झाली होती. त्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची तब्येत अत्यवस्था झाली. कुटुंबियांनी त्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

चिमुकल्यांच्या भांडणातून घराची तोडफोड

नांदुरा तालुक्यातील आंबोडा फाटा येथील रहिवासी असलेल्या मंगला अनिल इंगळे यांचा मुलगा आणि शेजारील निशा धुरंदर यांच्यात वाद झाला होता. मंगला या समजावण्यासाठी गेल्या असता, ज्योती धुरंदर, अश्विनी धुरंदर, वसंत धुरंदर आणि निखिल धुरंदर यांनी मंगला इंगळे यांना मारहाण केली. तर यातील आरोपी निखिल धुरंदर याने मंगला इंगळे यांच्या घरावर हल्ला चढवीत त्यांच्या कुडाच्या घराची तोडफोड करून त्यांचे २० हजार रुपयांचे नुकसान केले. मंगला अनिल इंगळे यांनी जलंब पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींवरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन बावणे हे करत आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात घडलेल्या या गंभीर घटनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढीस तर लागली नाही?, अशी शंका कायदेप्रिय नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!