शेतकरी व व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घालणारा आरोपी जेरबंद
मलकापूर पोलिसांकडून ऑनलाईन फसवणुकीचे जाळे उद्ध्वस्त; राज्यासह पर राज्यातील व्यापाऱ्यांना दिलासा

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि नवउद्योजकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा संशयित आरोपी शैलेश लिलाधर राठी याला बेड्या ठोकण्यात मलकापूर पोलिसांना यश आले आहे. या महाठगाने मलकापूरच नव्हे तर राज्याच्या व्यापारी वर्तुळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करून खळबळ उडवून दिल्याचे बोलल्या जात आहे. राठीच्या या अटकेमुळे अनेक मोठ्या व्यावसायिकांच्या फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन व्यापाराचे क्षेत्र जितके विस्तारत आहे, तितकेच या क्षेत्रातील फसवणुकीचे प्रकारही गंभीर रूप धारण करत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
पोलिसांनी बेड्या ठोकलेला आरोपी शैलेश राठी आणि त्याच्या टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मलकापूरच आणि राज्यातीलच नव्हे तर परराज्यातही विविध व्यावसायिक वर्तुळात आपल्या फसवणुकीचे जाळे विणले होते. या आरोपींनी “मां सचीया ट्रेडिंग कंपनी” या नावाचा वापर करून विविध डिजिटल माध्यमांतून व्यापाऱ्यांशी संपर्क साधून “ऑनलाइन विश्वासार्हता” निर्माण केले. सुरुवातीला कोणत्याही व्यापाऱ्याकडून मालाची ऑर्डर घेताना किंवा देताना अत्यंत व्यावसायिक शिष्टाचार पाळला. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीच्या काळा त काही व्यवहारांमध्ये अल्प रक्कम आगाऊ दिली. मात्र, एकदा का समोरच्या व्यापाऱ्याचा पूर्ण विश्वास बसला आणि व्यवहाराची व्याप्ती लाखोंवरून कोटींवर गेली, की खऱ्या अर्थाने फसवणुकीचा खेळ सुरू करायचे,असा गोरखधंदा त्यांनी चालवला होता.
आरोपींनी केवळ मोठे व्यापारीच नव्हे, तर ग्रामीण भागातील शेतकरी, लघुउद्योजक आणि नवीन व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या तरुणांनाही बळीचा बकरा बनवला. व्यवसायासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह मालाला मोठ्या प्रमाणात भाव देण्याचे आमिष दाखवून त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला. मात्र, ज्यावेळी शेतकऱ्यांना पैसे देण्याची वेळ आली, तेव्हा टाळाटाळ करणे, चुकीचे धनादेश देणे किंवा शेतकऱ्यांसोबत संपर्क तोडून गायब होण्याचे प्रकार सुरू केले. आरोपींकडे वारंवार पाठपुरावा करूनही राठी कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार दिला. तर अनेकदा त्यांनी दिलेले धनादेशही बाऊन्स झाले.
त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी मलकापूर शहर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. विविध ठिकाणांहून आलेल्या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी शैलेश लिलाधर राठी याला ताब्यात घेत असून त्याला संगमनेर न्यायालय येथे हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून, फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शिवसेना आक्रमक
शिवसेना (उबाठा) पक्ष याप्रकरणी चांगलाच आक्रमक झाला असून पक्षाचे नेते दीपक चांभारे यांनी कष्टाने पैसे कमावणाऱ्या उद्योजक आणि शेतकऱ्यांना लुटणाऱ्या अशा गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. ही केवळ एका व्यक्तीची फसवणूक नसून एका मोठ्या रॅकेटचा भाग आहे. फसवणूक झालेल्या समोर येऊन तक्रारी नोंदवाव्यात. शिवसेना त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.



