
खामगाव,(प्रतिनिधी): एका अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली.
खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथील रहिवासी असलेला आरोपी विजय रामदास तायडे (वय २९ वर्षे) याने पीडितेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्या वेळी पीडिता अल्पवयीन (वय १७ वर्षे) होती. आरोपीने पीडितेच्या आई- वडिलांची संमती न घेता तिला विहारात नेऊन १९ जुलै २०२५ रोजी हार घालून तीच्यासोबत विवाह केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले व ती गर्भवती झाली. अकोला येथील शासकीय रुग्णालयातून प्राप्त ओपीडी मेमो क्रमांक १७६५२ नुसार तपासणीदरम्यान पीडितेचा गर्भ बाधित असल्याचे निदर्शनास आले असून गर्भपाताचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. घटनेच्या वेळी पीडिता अल्पवयीन होती. तिची जन्मतारीख २२ जानेवारी २००८ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी खामगाव शहर पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ६४, पोक्सो कायदा कलम ४ (१) तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रीना सदार ह्या करत आहेत.



