‘त्या’ मानवी सांगाड्याची ओळख पटली
मृतक घारोड येथील श्रीकृष्ण तायडे असल्याचे निष्पन्न; मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच

खामगाव,(प्रतिनिधी):तालुक्यातील विहीगाव शिवारात धरणकाठी आढळून आलेल्या मानवी सांगाड्याची अखेर ओळख पटली असून सदर सांगाडा श्रीकृष्ण नारायण तायडे (वय ८० वर्षे) रा. घारोड (ता.खामगाव) यांचा असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती व खळबळ निर्माण झाली होती, हे विशेष!
रामनगर येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी महेंद्रसिंग मुख्त्यारसिंग राठोड (वय ५२ वर्षे) हे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास शेतातील मोटार सुरू करण्यासाठी मस धरण परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना धरणकाठावरील चिखलात मानवी कवटी व हाडे विखुरलेल्या अवस्थेत दिसून आली. जवळच काही फाटके कपडेही आढळल्याने त्यांनी तत्काळ खामगाव ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे कुजून केवळ सांगाडा उरलेला असल्याने सुरुवातीला ओळख पटत नव्हती. खामगाव ग्रामीण पोलिसांनी कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत मर्ग दाखल करून तपास सुरू केला होता.
परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासल्यानंतर व नातेवाईकांकडून कपड्यांच्या आधारे खात्री झाल्यावर मृत व्यक्तीची ओळख पटली असून सदर व्यक्ती श्रीकृष्ण नारायण तायडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?, हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.



