क्राईम जगत
“बजरंगी डीजे”ची फिल्मी स्टाईल लूट
मारहाण करून लुटारुंनी १० लाखांचे वाहन पळवले; हिवरखेड जवळील घटना

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीची ऑर्डर संपवून घराकडे परतणाऱ्या डीजे चालकाला अडविले. त्याला बेदम मारहाण करून त्याचा १० लाख रुपये किमतीचे डीजे वाहन जबरदस्तीने पळवून नेले. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभणारी ही घटना हिवरखेड जवळ येणाऱ्या आंबेटाकळी फाट्यावर घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांत अकोल्यातील चार जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटाळा बुद्रुक (ता.खामगाव) येथील रहिवासी असलेले अभय संजय वसतकार (वय २३ वर्षे) यांचा डीजे चालक हा व्यवसाय आहे. १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंती होती. या जयंतीनिमित्त त्यांनी देऊळगाव साकर्शा येथे डीजेची ऑर्डर घेतली होती. मिरवणूक संपल्यावर अभय वसतकार आणि त्यांचा सहकारी सिद्धांत गोलाईत हे त्यांच्या ताब्यातील “बजरंगी डीजे” वाहन क्रमांक एमएच-२१-एक्स-८१९१ घेऊन खामगावच्या दिशेने परत जात होते. त्यावेळी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन आंबेटाकळी फाट्याजवळ आरोपी मंगेश शितळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अचानक वाहनासमोर येऊन रस्ता अडवला. त्यानंतर अभय वसतकार यांना वाहनातून खाली खेचून चापटा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी मदतीला धावलेल्या सिद्धांत गोलाईत यालाही आरोपींनी धक्काबुक्की केली. एवढ्यावरच न थांबता अभय यांच्याकडून वाहनाची चावी जबरदस्तीने हिसकावून घेत त्यांचे १० लाख रुपये किमतीचे डीजे वाहन घेऊन अकोल्याच्या दिशेने पसार झाले.
याप्रकरणी अभय वसतकार यांनी हिवरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मंगेश उत्तम शितळे, आदित्य उत्तम शितळे, पुरुषोत्तम शितळे आणि प्रफुल्ल संजय आठवले (सर्व रा. जेतवन नगर, अकोला) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०९ (६), १२६ (२), ३५१ (२)(३), ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील साठे हे करीत आहेत. आरोपी अकोला येथील रहिवासी असून जुन्या वादातून किंवा आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.



