
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : आपल्यावर चारचौघांत सतत होत असलेले आरोप, आणि त्यामुळे होणारी बदनामी सहन न झाल्याने एका ३० वर्षीय तरुणाने आपल्याच राहत्या घरात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे घडली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रुधाना येथील रहिवासी असलेला आरोपी दीपक उंबरकार हा गेल्या १५ ते २० दिवसांपासून मृतक अजय रामदास वानखडे याच्या चारित्र्यावर संशय घेत “तुझे माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत,” असे आरोप करत होता. तसेच अजयच्या गावी जाऊन त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता. या वादावर पडदा टाकून सदर वाद मिटवण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्षांकडील नातेवाईकांनी एक बैठक ठेवली होती. ही बैठक सुरू असताना सुद्धा आरोपी दीपक उंबरकार याने अजयला सर्वांसमोर पुन्हा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आपली विनाकारण बदनामी होत आहे आणि लोक काय म्हणतील, या विचाराने अजय वानखडे प्रचंड मानसिक तणावाखाली आला. बैठक सुरू असतानाच त्याने घरातील मागच्या खोलीत जाऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणी मृतक अजयचे आत्माराम नरिभाऊ अढाऊ (रा.अकोट) यांनी तामगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी दीपक उंबरकार याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १०८, ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे हे करीत आहेत.



