जिल्हा सामान्य रुग्णालयाला बेवड्यांचा विळखा
केंद्रीय मंत्र्यांच्या "आयुष" रुग्णालयाबाहेर बाटल्यांचा खच!

बुलढाणा,(प्रतिनिधी): रुग्णांना जीवनदान देणाऱ्या आणि आरोग्य सेवेचा कणा समजल्या जाणाऱ्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील पवित्र वास्तूच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला. त्यामुळे या परिसराचे रूपांतर जणू मद्यपींच्या अड्ड्यात झाले की काय?, अशी शंका उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अखत्यारीत येणाऱ्या “आयुष” रुग्णालयाच्या अगदी बाजूलाच हा प्रकार सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाच्या नाकाखाली या परिसरात मद्यपींनी धुमाकूळ घातला आहे. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या आडोशाला आणि “आयुष” विभागाच्या इमारतीबाहेर विदेशी व देशी दारूच्या बाटल्यांचा मोठा खच साचला आहे. स्वच्छतेचे आणि शिस्तीचे नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपींच्या पार्ट्या चालतात, हे या विदारक दृश्यावरून स्पष्ट होत आहे.
रुग्णालय परिसरात केवळ बाटल्यांचा खचच नाही, तर मद्यपींच्या वावरामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्ण आणि त्यांच्या महिला नातेवाईकांमध्ये यामुळे तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्री-अपरात्री या परिसरातून ये-जा करताना महिलांना मद्यपींच्या अश्लील शेरेबाजीला किंवा उपद्रवाला सामोरे जावे लागण्याची भीती वाटत आहे. “आम्ही येथे आजार बरा करायला येतो की जीव धोक्यात घालायला?” असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांमधून उपस्थित केला जात आहे.
या प्रकारामुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, या मद्यपींच्या त्रासामुळे एखादी मोठी अनुचित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी रुग्णालय प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा नागरिक देत आहेत.
प्रशासनाचे “अर्थपूर्ण” दुर्लक्ष?
एकीकडे केंद्रीय आरोग्य व आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे त्यांच्याच जिल्ह्यात आणि त्यांच्याच विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयाबाहेर हा प्रकार घडत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. रुग्णालयाचा सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन या मद्यपींवर कारवाई का करत नाही? सीसीटीव्ही कॅमेरे असूनही हे प्रकार कसे घडतात? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.



