धाडवासियांनी अनुभवला पोलिसांचा ‘सिंघम’अवतार
संघटित गुन्हे करणाऱ्या टोळीची काढली धिंड; ठाणेदार प्रताप भोस यांची धाडसी कारवाई

अभिनय बोर्डे
बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील मस्तावलेल्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे. गुंडशाही आणि अराजकता माजवणाऱ्यांची कोणतीच गय करू नका, असे आदेशही त्यांनी सर्व ठाणेदारांना दिलेले आहेत. त्यांच्या या आदेशाची धाड पोलिसांनी अक्षरश: ‘अंमलबजावणी’ करून दाखवली. धाड ठाणेदार प्रताप भोस यांनी संघटित गुन्हेगारी करणाऱ्या अक्षय बिलंगे टोळीच्या मुसक्या तर आवळल्याच, पण या आरोपींची गावातून धिंड काढली. धाडच्या इतिहासातील ही पहिलीच मोठी धिंड असल्याचे बोलले जात असून, या कारवाईमुळे ठाणेदार भोस यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धाड येथील समर्थ मेडीकलच्या संचालकास ६ फेब्रुवारी २०२६ रोजी या टोळीने एका व्यक्तीला कड्याने मारहाण करून जखमी केले होते आणि जीवाने मारण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितली होती. ही टोळी केवळ हा एकच गुन्हा करून थांबली नव्हती, तर ते संघटितपणे गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे विना नंबर प्लेटची बुलेट, मोटारसायकली आणि महागडे मोबाइल मिळून आल्याने त्यांनी गुन्हेगारीच्या पैशातून घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे. नेहमीच गुन्हेगारी कृत्यांनी दहशत माजवणाऱ्या या टोळीचा माज उतरवण्यासाठी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली. अटक करण्यात आलेला टोळीप्रमुख आरोपी अक्षय जीवनलाल बिलंगे (वय २३ वर्षे), रोशन गणेश शिंदे (वय २२ वर्षे) आणि राहुल विजय दळवी (वय २४ वर्षे) यांची पोलिसांनी धाडनगरीतून धिंड काढली. ज्या ठिकाणी आरोपींनी राडा केला, त्याच ठिकाणी आणि त्यांचा वावर असलेल्या रस्त्यांवरून पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी बेड्या ठोकून त्यांना पायी चालवले. धाड शहराच्या इतिहासात गुन्हेगारांची अशा प्रकारे जाहीर धिंड काढण्याची ही बहुदा पहिली वेळ असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या धाडसाला दाद दिली.
ठाणेदार भोस यांची ‘डॅशिंग’ कामगिरी
ठाणेदार प्रताप भोस यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी जगतावर वचक निर्माण केला आहे. केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, त्यांनी या प्रकरणाचा तांत्रिक आणि सखोल अभ्यास करून या टोळीवर भारतीय न्याय संहितेचे अत्यंत कडक समजले जाणारे ‘कलम १११’ (संघटित गुन्हेगारी) लावण्यासाठी वरिष्ठांची परवानगी मिळवली. गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवण्यासोबतच, समाजात पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचे काम ठाणेदार भोस आणि त्यांच्या टीमने केले आहे. त्यांच्या या ‘ऑन फिल्ड’ ॲक्शनमुळे प्रामाणिक नागरिक स्वत:ला सुरक्षित मानत आहेत.
तपास पथकाचा मोठा विजय
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात तसेच ठाणेदार प्रताप भोस यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, तपासी अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण, प्रभाकर लोखंडे, प्रल्हाद शेजोळ, रवींद्र बऱ्हाटे, रवींद्र चव्हाण, युवराज मुळे, नितीन माळोदे, इम्रान पठाण, सतिष जाधव, भगवान खमाटे आणि वैशाली कोरडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली असून यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे.
चार दिवसांचा ‘पीसीआर’
गुन्हेगार कितीही मोठा असला तरी तो कायद्यापेक्षा मोठा नाही, हा संदेश ठाणेदार भोस यांनी या धिंडीच्या माध्यमातून दिला आहे. २० फेब्रुवारीपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांच्याकडून अजून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.



