क्राईम जगत

क्राईम डायरी: विवाहितेचा छळ, पतीचा राडा अन् अपघाती मृत्यू

गंभीर घटनांनी हादरला जिल्हा

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांच्या अभिलेखावर गेल्या २४ तासांत गुन्हेगारी, कौटुंबिक हिंसाचार आणि अपघात, अशा चार गंभीर आणि धक्कादायक घटनांची नोंद झाली. जळगाव जामोदमध्ये एका विवाहितेला हुंड्यासाठी ‘तीन तलाक’ची धमकी देण्यात आली, तर बुलढाणा शहरात एका मद्यपी पतीने कामाच्या ठिकाणी जाऊन पत्नीला अश्लील शिवीगाळ करत गोंधळ घातला. लोणारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तर धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनांमुळे जिल्हा ढवळून निघाला.
जळगावमध्ये तीन तलाकची धमकी
जळगाव जामोद: पोलीस स्टेशन अंतर्गत २३ वर्षीय विवाहिता जुबीयाना अनम तौफीक शेख हिने पती तौफीक सईद शेख आणि सासरच्या सहा जणांविरुद्ध छळाची तक्रार दिली.
जुबीयाना यांच्या तक्रारीनुसार त्यांना लग्नानंतर सतत पैशांची मागणी करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत होता. इतकेच नाही तर, तिला ‘तीन तलाक’ देण्याची धमकी देऊन, पोलीस तक्रार केल्यास स्वतःचे बरे-वाईट करून तिला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीतीही दाखवण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कामाच्या ठिकाणी मद्यपी पतीचा राडा
बुलढाणा: बुलढाणा शहरातील रहिवासी असलेल्या चंद्रप्रभा लागे या महिला मजुरी आणि धुणी-भांड्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, त्यांचे पती जगदीश लागे यांना दारूचे व्यसन  आहे. “तू काम का करतेस?” या कारणावरून त्यांनी पत्नीसोबत कामाच्या ठिकाणी जाऊन वाद घातला. तसेच त्यांना अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर रागाच्या भरात घराच्या दरवाजावर दगड मारून नुकसानही केले. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
रस्ता अपघात आणि आत्महत्या
लोणार येथील मंठा नाक्यावर राजेश बबन पारे (वय ३९ वर्षे) हे आपली दुचाकी क्रमांक एमएच-२८-एवाय-४४७४ भरधाव वेगाने चालवत असताना गाडी घसरून भीषण अपघात झाला. या अपघातात राजेश पारे गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सावरगाव जहागीर येथील १४ वर्षीय मुलगी योगिता सुनील भारती हिने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केले. कुटुंबियांनी तिला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांची पोलिसांनी नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!