क्राईम जगत

शिवीगाळ करत महिलेला जीवे मारण्याची धमकी

चांडोळच्या आरोपीविरुद्ध धाड पोलिसांत गुन्हा दाखल

अभिनय बोर्डे
धाड, (प्रतिनिधी): धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांडोळ येथे एका २८ वर्षीय महिलेला भररस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांवरून जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या आणि वादाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
चांडोळ (ता.बुलढाणा) येथील रहिवासी असलेल्या नयना युवराज छानवाल (वय २८ वर्षे) या १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या घराचे काम आटपून शेतात जात होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत गावातील इतर काही महिला देखील होत्या. वाटेत आरोपी कपल देवसिंग छानवाल (रा. चांडोळ) याने या महिलांना अडवले. तसेच “माझ्या घरातून बाज बाहेर आणून द्या, मी रस्त्यावर झोपतो”, असे म्हटले. एवढेच नाही तर त्याने नयना छानवाल यांच्यासोबत विनाकारण वाद घालत त्यांच्याकडे बघून अश्लील आणि घाणेरडी शिवीगाळ केली. “तू माझ्या दारासमोरून जायचे नाही”, असे म्हणत नयना यांच्या अंगावर धावून जात दहशत निर्माण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नयना छानवाल ह्या प्रचंड घाबरल्या आणि त्यांना घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
या प्रकरणी त्यांनी धाड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम कलम २९६, ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शांताराम जाधव हे करत आहेत. या घटनेमुळे चांडोळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, हे विशेष!

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!