क्राईम जगत

क्राईम डायरी: नांदुऱ्यात भररस्त्यात पत्नीला तिहेरी तलाक

मेहकर आणि खामगावात धाडसी चोऱ्या!

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या २४ तासांत गुन्हेगारीच्या तीन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. नांदुरा येथे न्यायालय परिसराबाहेरच एका विवाहितेला पती आणि दिरांनी मारहाण करत बेकायदेशीर ‘तिहेरी तलाक’ दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुसरीकडे, मेहकर आणि खामगाव ग्रामीण भागात अज्ञात चोरट्यांनी आपला इंगा दाखवत दुचाकी आणि रोख रकमेवर डल्ला मारला आहे.

कोर्टाच्या गेटवरच पत्नीला ‘तिहेरी तलाक’!

नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत एका २६ वर्षीय विवाहितेवर भररस्त्यात अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

पिंपळगाव राजा येथील रहिवासी असलेली नुसरत परवीन मोहम्मद सादीक हिने सासरच्या जाचाविरुद्ध न्यायालयात तक्रार केली होती. २२ जानेवारी रोजी न्यायालयाची तारीख संपवून ती आपल्या आईसोबत बाहेर येत असताना, तिचा पती मोहम्मद सादीक आणि मोहम्मद शफीक व मोहम्मद रफीक या दोन भावांनी तिला गाठले. “तू केस का टाकली? आता तुला सोडत नाही,” असे म्हणत पतीने तिला मारहाण केली. यावेळी दिरांनी चिथावणी दिल्यानंतर आरोपी पतीने सर्वांसमोर ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणून तिहेरी तलाक दिला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मुस्लिम महिला विवाह हक्कांचे संरक्षण कायदा २०१९ च्या कलम ३, ४ आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार मोहीद्दीन सैय्यद हे करत आहेत.

मेहकरमधून दुचाकी लंपास

मेहकर शहरात सुलतानपूर परिसरातून अज्ञात चोरट्याने घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

सुलतानपूर येथील रहिवासी असलेले मोईन खान मन्नान खान पठाण यांनी आपली काळ्या रंगाची एचएफ डिलक्स क्रमांक एमएच-२८-एव्ही-९२८४ दुचाकी १७ फेब्रुवारीच्या रात्री घरासमोर पार्क केली होती. सकाळी उठून पाहिले असता गाडी गायब असल्याचे लक्षात आले. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे ४० हजार रुपये आहे. मेहकर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार राजेश जाधव हे करीत आहेत.

कोलोरी येथे घरफोडी

खामगाव तालुक्यात येणाऱ्या कोलोरी येथे अज्ञात चोरट्यांनी दिपक सोनाजी अंभोरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ६४ हजार रुपये रोख लंपास केला.

दिपक सोनाजी अंभोरे हे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. १७ ते १८ फेब्रुवारीच्या दरम्यान, ते घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यातील ६४ रुपये रोख लंपास केले. याप्रकरणी त्यांनी खामगाव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार किरण राऊत हे करत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!