जिल्हा हादरला! म्हणे “तुझ्या पत्नीचे लग्न माझ्याशी लावून दे”!
लग्नासाठी तगादा लावत विवाहिता आणि तरुणीला जिवे मारण्याच्या धमक्या; शेगाव व जळगाव जामोदमध्ये गुन्हे दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, आता लग्नासाठी तगादा लावून धमकावण्याचे दोन गंभीर प्रकार समोर आले आहेत. शेगाव ग्रामीण आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपींनी महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे गुन्हेगारांचे वाढते मनोबल कायदा आणि सुव्यस्थेसाठी घातक ठरण्याची शंका व्यक्त होत आहे.
पाडसुळमध्ये खळबळ
शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाडसुळ गावातीलच एका इसमाने चक्क एका पतीला गाठून “तुझ्या पत्नीचे लग्न माझ्याशी लावून दे”, अशी अजब आणि संतापजनक मागणी केली.
भगवान प्रकाश बिलेवार (वय ३२ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आरोपी सोपान तुळशीराम नाणे याने त्यांना अडवले. आरोपीने त्यांना धमकावत “तुझ्या पत्नीचे लग्न माझ्याशी लावून दे, नाहीतर मी तुमची संपूर्ण गावात बदनामी करीन.”, आहे म्हटले. एवढ्यावरच न थांबता त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी भगवान बिलेवार यांनी शेगाव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६( २), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार धनराज माने हे करीत आहेत.
लग्नास नकार दिल्याने जिवे मारण्याची धमकी
जळगाव जामोद: तालुक्यातील सुनगाव येथे एका तरुणाने लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याच्या रागातून तरुणीला आणि तिच्या होणाऱ्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली.
सुनगाव येथील छाया गोपाल अबडकार (वय ३४ वर्षे) यांच्याशी आरोपी सुनील रामभाऊ काळपाडे (रा.जामोद) याचे लग्नासाठी बोलणे झाले होते. मात्र, काही कारणास्तव छाया अबडकार यांच्या कुटुंबीयांनी या लग्नास नकार दिला. हा नकार आरोपीच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून आरोपी सुनील हा छाया अबडकार यांच्या घराच्या अवतीभोवती वाईट उद्देशाने चकरा मारत होता. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आरोपीने त्यांना गाठून “माझ्याशीच लग्न कर, नाहीतर तुझे लग्न ज्या मुलाशी ठरले आहे त्याला आणि त्याच्या भावाला मी मारून टाकीन”, अशी धमकी दिली. या प्रकरणी छाया अबडकार यांनी
जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८, ३५२, ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार शेख इरफान हे करत आहेत.



