क्राईम जगत

धक्कादायक! शिवरायांचा पुतळा हटवण्यास विरोध केला म्हणून महिलेच्या अंगावरील कपडे फाडले

पीडित महिलेचा व्हॉट्सअँप स्टेटसवरून आत्महत्येचा इशारा; मनोज जरांगे पाटील भेट घेणार असल्याची माहिती

आनंद इंगळे
सिंदखेड राजा, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्यासाठी गेलेल्या एका महिला लोकप्रतिनिधीला बेदम मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याची खळबळजनक आणि तेवढीच संतापजनक घटना लोणार तालुक्यातील चिखला (ता.लोणार) येथे घडली. विशेष म्हणजे सदर महिला शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ असून त्यांनी सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांसमोर आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. नव्हेतर “माझं सगळं संपलं आहे, मी उद्या सकाळी ७ वाजता आत्महत्या करणार,” असे व्हॉट्सॲप स्टेटस देखील संजीवनी वाघ यांनी ठेवल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

चिखला (ता.लोणार) येथे काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र, गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांकडून हा पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू होत्या. याची माहिती शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली आणि पुतळा हटवण्यास विरोध केला. याचा राग मनात धरून गावाच्या सरपंचांनी गावातील काही महिला आणि पुरुषांना जमा केले. या जमावाने वाघ यांना घेराव घालून बेदम मारहाण केल्याचा आरोप संजीवनी वाघ यांनी केला आहे. या झटापटीत संजीवनी वाघ यांच्या अंगावरील कपडे फाडण्यात असून सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांच्या समक्ष हा प्रकार घडल्याचाही आरोप वाघ यांनी केला आहे. या घटनेनंतर चिखला काकड गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
आत्महत्या करणार असल्याचे स्टेटस
मारहाणीच्या घटनेने खचलेल्या संजीवनी वाघ यांनी सोशल मीडियावर अत्यंत टोकाचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्याची हीच सजा आहे का? पोलिसांच्या डोळ्यादेखत माझे कपडे फाडले गेले, माझी अब्रू वेशीवर टांगली गेली. आता जगण्यात अर्थ नाही, मी आत्महत्या करणार आहे,” असे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील संजीवनी वाघ यांच्या भेटीला?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादातून महिला नेत्याला झालेली मारहाण आणि त्यांची झालेली विटंबना, याचे पडसाद आता राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रकरणाची दखल घेतली असून ते संजीवनी वाघ यांची भेट घेणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!