
अभिनय बोर्डे
धाड (प्रतिनिधी): धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढासाळवाडी (ता. बुलढाणा) येथील एक ४८ वर्षीय व्यक्ती आपल्या शेतात संशयास्पद रित्या मृतावस्थेत आढळल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून संतोष दगडू दळवी (वय ४८ वर्षे) रा. ढासाळवाडी), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी धाड पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ढासाळवाडी (ता.बुलढाणा) येथील रहिवासी असलेले संतोष दळवी हे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. यादरम्यान, त्यांचे भाचे निलेश शिवाजी गायकवाड (वय २५ वर्षे) रा. मेरखेड यांनी शोध घेतला असता, संतोष दळवी हे त्यांच्या स्वतःच्या शेतात मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा केला. तसेच मृतदेह शासकीय विभागात सर्व विच्छादनासाठी रवाना करण्यात आला.
याप्रकरणी निलेश गायकवाड यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला आहे. मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा मृत्यूचे उघड कारण दिसून आले नाही. घटनेचा पुढील तपास धाड ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार समाधान देशमाने हे करीत आहेत. संतोष दळवी यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य काही कारणाने झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.



