क्राईम जगत
बुलढाण्याच्या दोन लेकींचा नराधमांनी घेतला बळी
नाशिकमध्ये "पिझ्झा पार्टी"च्या बहाण्याने खून; तर मोताळ्यात तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्याने आज आपल्या दोन कळ्या उमलण्याआधीच गमावल्या आहेत. एकीचा नाशिकच्या सारूळ जंगलात “पिझ्झा पार्टी”च्या बहाण्याने खून करण्यात आला. तर दुसरीचा मोताळा येथील नदीपात्रात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. सोशल मीडियावरील संवाद आणि त्यातून निर्माण होणारे गैरसमज अशा गंभीर गुन्ह्यांना कारणीभूत ठरत असून महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्याचा दावा या दोन घटनांमुळे फोल ठरला आहे.
सारूळ (जि.नाशिक) येथील जंगलात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तपासाअंती ही मुलगी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील असल्याचे निष्पन्न झाले. शिक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या या मुलीचा अंत इतका भयानक असेल, याची कल्पनाही तिच्या पालकांनी केली नसेल. या घटनेतील मुख्य आरोपी अथर्व देशमुख याने त्याचा साथीदार सुमित सानफ याच्यासोबत मिळून हा कट रचला. पीडित मुलगी अकोले येथे ११ वीत शिकत होती, तर आरोपी नाशिकमध्ये शिक्षण घेत होता. “ती मला इग्नोर करतेय” आणि “ती दुसऱ्या मुलाशी बोलते” या संशयातून अथर्वने टोकाचे पाऊल उचलले. तिला ‘पिझ्झा पार्टी’च्या बहाण्याने बोलावून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. जेव्हा पोलिसांना मृतदेह सापडला, तेव्हा तिच्या गळ्यात चाकू अडकलेला होता आणि शेजारी पिझ्झा पडलेला होता. हा केवळ खून नसून एका विकृत मानसिकतेचा कळसच म्हणावा लागेल.
नाशिकची ही घटना ताजी असतानाच, बुलढाण्यातील मोताळा परिसर एका दुसऱ्या घटनेने हादरला गेला. १७ वर्षीय गौरी शरद पांडे या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गिट्टी खदान परिसरातील नदीपात्रात, कोर्टाच्या इमारतीमागे विवस्त्र अवस्थेत तरंगताना आढळला. या मृतदेहाची अवस्था पाहून मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. फॉरेन्सिक टीम आणि पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून मोताळा परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. विशेष म्हणजे आजच्या तरुण पिढीमध्ये संवाद कमी आणि हिंसक प्रवृत्ती वाढत चालली असल्याची प्रचिती या घटनांवरून आली आहे. या दोन्ही घटना केवळ गुन्हे नसून समाजाला लागलेली कीड आहे. आरोपींना अटक झाली असली तरी, जोपर्यंत त्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळणार नाही, अशी भावना समाजमनातून व्यक्त होत आहे.



