
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : नांदुरा तालुक्यात येणाऱ्या धानोरा खुर्द येथून एक १८ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर चिंतेचे सावट पसरले आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू आहे.
धानोरा खुर्द (ता.नांदुरा) येथील रहिवासी असलेले गोपाल श्रीकृष्ण डाबेराव (वय ४४ वर्षे) हे मजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तनुजा गोपाल डाबेराव नावाची १८ वर्षांची मुलगी आहे. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास तनुजा घरात कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. ती मैत्रिणीकडे गेली असेल, असे म्हणत कुटुंबाने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. मात्र, सायंकाळ होऊनही तनुजा घरी परतली नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. वडिलांनी व नातेवाईकांनी तिचा गाव परिसर, नातेवाईक आणि शक्य असलेल्या सर्व ठिकाणी शोध घेतला. मात्र, तिचा सुगावा लागला नाही.
दरम्यान, या प्रकरणी तिचे वडील गोपाल श्रीकृष्ण डाबेराव यांनी २२ फेब्रुवारी रोजी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. तनुजाची उंची अंदाजे ५ फूट २ इंच, बांधा सडपातळ शरीरयष्टी, निमगोरा रंग आणि लांबट चेहरा, काळे लांब केस आणि काळे डोळे असे असून तिने अंगात कथ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाची लेंगी घातलेली आहे. वरील वर्णनाच्या तरुणीबाबत काही माहिती मिळाल्यास नांदुरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार सोळंके यांनी केले आहे.



