क्राईम जगत

मलकापूर पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक

दोन महिन्यात दारू, जुगार अन् गुटखा माफियांना फोडला घाम; ७० मोबाइलसह लाखांचा मुद्देमाल जप्त

अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी) : विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूरनगरीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले होते. मात्र, आता मलकापूर शहर पोलिसांनी या अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वात शहरात धडाकेबाज मोहीम राबवण्यात आली. यामुळे दोन महिन्यात दारू, जुगार अन् गुटखा माफियांना चांगलाच घाम फोडत ७० मोबाइलसह लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.
मलकापूर शहरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी १ जाने ते २० फेब्रु २०२६ या कालावधीत म्हणजे गेल्या ५० दिवसांत विविध कायद्यांतर्गत धडाकेबाज कारवाई केली. यामध्ये दारूबंदी कायद्यांतर्गत पोलिसांनी एकुण १६ गुन्हे दाखल करून १४ हजार ८०० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये १४ कारवाया करण्यात येऊन ५ हजार ९९५ रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. संशयास्पद हालचाली करणाऱ्यांकडून एकूण ७० मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले असून या जप्त केलेल्या मोबाइलची किंमत साधारण ४ ते ४.५० लाख रुपये आहे. गुटखा, तंबाखू आणि सिगारेटची अवैध विक्री करणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल करत ८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केला.
पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून मलकापूरच्या गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. सोबतच त्यांच्या या धडाकेबाज अ‍ॅक्शनमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या या सतर्कतेमुळे मलकापूरची प्रतिमा सुधारण्यास मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
गुन्हेगारी खपवून घेणार नाही: पोनि गिरी
मलकापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आमची प्राथमिकता आहे. अवैध धंदे करणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. ही तर फक्त सुरुवात आहे, आगामी काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील. असा इशारा देत शहरात कुठेही बेकायदेशीर कृत्य घडत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी केले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!