क्राईम जगत

मलकापूर: वीज चोरांविरुद्ध महावितरणचे धाडसत्र!

वीज चोरीचे दोन गुन्हे दाखल, हजारो रुपयांचा दंड

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): मलकापूर तालुक्यातील उमाळी आणि दाताळा परिसरात महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात दोन ठिकाणी वीज चोरी पकडण्यात आली. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या व्यक्तींविरुद्ध विद्युत कायद्याचे कलम १३५ अन्वये जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. विजेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांविरुद्ध महावितरण कंपनीने उचललेल्या या आक्रमक पाऊलामुळे वीज चोरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

उमाळीत आकडा टाकून वीज चोरी

उमाळी (ता. मलकापूर) येथे महावितरणचे सहाय्यक अभियंता संदीप मधुकर श्रीधनकर आणि त्यांच्या पथकाने ४ एप्रिल २०२५ रोजी प्रल्हाद राजाराम सातव (वय ६० वर्षे) यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत प्रल्हाद राजाराम सातव यांनी लघुदाब वाहिनीवर सुमारे २० फूट लांबीची काळी वायर वापरून थेट आकडा टाकल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यांनी गेल्या १२ महिन्यांत एकूण २१६ युनिट्सची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तर तडजोड रकमेसह एकूण ८ हजार २४० रुपयांची ही चोरी असल्याचे समोर आले आहे.

दाताळ्यात मीटरमध्ये फेरफार करून मारला डल्ला

दाताळा: येथील इंदिरानगर भागात राहणारे मोहम्मद शाह बादशाह आसखान (वय ६० वर्षे ) याने वीज मीटरमध्ये तांत्रिक फेरफार केल्याचे उघड झाले. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता, मीटरची बॉडी खोलून न्यूट्रल सीटीची वायर कापलेली आढळली, तर फेज सीटीमध्ये वापरलेल्या विजेची नोंद मीटरमध्ये होऊ नये म्हणून विद्युत अवरोधक जोडलेला दिसून आला. या प्रकारामुळे महावितरणचे गेल्या १२ महिन्यात १४६१ युनिट्सचे नुकसान झाले. तडजोड शुल्कासह ही रक्कम ३० हजार ४७० रुपये असल्याची माहिती महावितरणने दिली. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी वीज चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले असून वीज चोरी संदर्भातील कारवाया भविष्यातही सुरूच राहतील, असा इशारा महावितरणच्या वतीने देण्यात आला आहे.

या दोन्ही घटनांमध्ये महावितरणचे सहाय्यक अभियंता संदीप श्रीधनकर यांनी खामगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विद्युत कायद्याचे कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल केले आहे. गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाने हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!