स्मार्ट बुलढाणा

वादाच्या जागेवरच शिवरायांचा अश्वारूढ पुतळा विराजमान

चिखल्यात शिवगर्जनांचा जयघोष; हजारो शिवभक्तांची उपस्थिती

आनंद इंगळे

सिंदखेड राजा,(प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात जो स्वाभिमानाचा हुंकार घुमतो, त्याच आवेशाची प्रचिती चिखला (ता.लोणार) गावात आली. गेल्या काही दिवसांपासून पुतळा हटवण्यावरून निर्माण झालेला तणाव, पोलिसांचा खडा पहारा आणि प्रशासकीय पेच या सर्वांना बाजूला सारत, शिवभक्तांनी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची त्याच जागी पुनर्स्थापना केली. त्यामुळे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात चैतन्य पसरले असून शिवप्रेमींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे दिसून आले.

चिखला (ता.लोणार) येथे काही दिवसांपूर्वी सार्वजनिक जागेवर महाराजांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटांत वाद निर्माण झाला होता. नव्हेतर या वादात एक महिलेचे कपडे फाडण्यात आल्याचा आरोप दस्तुरखुद्द महिलेने माध्यमांसमोर केला होता. त्यामुळे गावातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. हजारो शिवभक्त चिखल्याच्या दिशेने कूच करत होते. याच पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गावाला भेट देऊन शांततेचे आवाहन केले होते, मात्र “शिवरायांचा पुतळा तिथून हलवू नका,” असा सज्जड दमही प्रशासनाला दिला होता.

दरम्यान, २१ फेब्रुवारीच्या रात्री प्रशासकीय निर्बंध आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असतानाही शेकडो शिवप्रेमींनी एकत्र येत एक ऐतिहासिक निर्णय घेतला. वादाच्या भोवऱ्यात असलेला पुतळा सन्मानाने बाजूला सारून त्याच पवित्र जागी छत्रपती शिवरायांचा अत्यंत देखणा आणि भव्य असा अश्वारूढ पुतळा आणण्यात आला. पुतळ्याची मिरवणूक काढून त्याच जागी नवीन पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आली. रात्रीच्या त्या किर्रर्र अंधारात जेव्हा भगवे ध्वज हवेत फडकू लागले आणि जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेल्याने चिखला गावात जणू काही शिवकाळात गेल्याचा भास झाला. पुतळा बसवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात पुन्हा एकदा हजारो शिवभक्तांची गर्दी जमली. मात्र, यावेळी शिवभक्तांच्या चेहऱ्यावर संताप नाही, तर समाधान दिसून आले. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असला तरी, शिवरायांच्या त्या तेजाळलेल्या अश्वारूढ रूपाकडे पाहून गावातील वातावरण आता भक्तिमय झाल्याचे दिसून येत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!