क्राईम जगत

पोलिसांना मारहाण: दारूड्या दाम्पत्याचा भररस्त्यात “हायव्होल्टेज ड्रामा”

तासाभराने पोहोचली पोलिसाला पोलिसांची मदत; खाकीची अब्रू चव्हाट्यावर!

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : दारूच्या नशेत झिंगलेल्या एका दुचाकीस्वाराने त्याला अडवणाऱ्या वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आपल्या पत्नीसह मिळून पोलिसांच्या अंगावर हात उचलत त्यांना भररस्त्यात मारहाण केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नलजवळ ही थरारक आणि तेवढीच संतापजनक घटना घडली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीसाठी पोलीस कुमक पोहोचायला तब्बल एक तास लागला, तोपर्यंत हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ सुरूच होता, हे विशेष!
छत्रपती संभाजीनगर येथील सिडको वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार रावसाहेब पचलोरे आणि संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नलवर कर्तव्य बजावत होते. दरम्यान, सोमनाथ मुरलीधर गिरी (वय २७ वर्षे) हा आपल्या दुचाकीने क्रमांक एमएच-१७-सीक्यू-६७४२ ने  दुभाजकाजवळून वेडीवाकडी गाडी चालवत जात असताना पोलिसांनी त्याला बघितले. तो स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी खेळत असल्याचे पाहून पचलोरे यांनी त्याला थांबवले. प्रचंड दारू प्यायलेला असलेल्या सोमनाथला पोलिसांनी गाडी थांबवण्यास सांगितल्याचा राग आला आणि त्याने थेट वर्दीवर हात टाकण्यास सुरुवात केली. “तुम्हाला दोन दिवसांत बघून घेतो,” अशी धमकी देत त्याने पोलीस अंमलदार पचलोरे यांच्या कानशिलात लगावली आणि खरात यांच्या अंगावरही धावून गेला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर सोमनाथने आपली पत्नी अनिता सोमनाथ गिरी (वय २५ वर्षे) हिला घटनास्थळी बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर या दाम्पत्याचा अवतार अधिकच रौद्र झाला. दोघांनी मिळून पोलिसांना लोटपोट केली आणि सरकारी कामात अडथळा आणला.
इतकेच नाही तर, झिंगलेल्या सोमनाथने थेट रस्त्याच्या मधोमध झोपून वाहतूक रोखून धरली आणि धिंगाणा घातला. भररस्त्यात दोन पोलिसांना मारहाण होत असताना त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षाला मदतीसाठी फोन केला. मात्र, आपल्याच सहकाऱ्यांच्या मदतीला धावून येण्यासाठी पोलिसांना तब्बल एक तास लागला. खाकी वर्दीची अब्रू भररस्त्यात लिलाव होत असताना पोलीस उशिरा पोहोचल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अखेर पोलिसांनी मदत केली नाही, म्हणून सामान्य नागरिकांनीच पुढाकार घेऊन त्या दारूड्याला आवर घातला. यावेळी पोलीस यंत्रणेचा ढिसाळपणा दिसून आला. तासाभरानंतर पुंडलिकनगर पोलीस आणि दामिनी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सोमनाथ गिरी आणि त्याची पत्नी अनिता गिरी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या दाम्पत्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना मारहाण करणे आणि धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!