मलकापूरनगरीत उसळला राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीचा जल्लोष
परीट बांधवांनी दिला सामाजिक ऐक्याचा संदेश; शहरात उत्साहाचे वातावरण

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : विदर्भाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मलकापूर शहरात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परीट बांधवांच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता, समता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या महामानवाला अभिवादन करण्यासाठी शहरात भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आकर्षक सजविण्यात आलेल्या ट्रॅक्टरवर संत गाडगेबाबांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. सर्वप्रथम गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सकाळी बुलढाणा रोडवरून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि जयघोषात निघालेल्या रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. “स्वच्छता हीच खरी सेवा”, “समाज एकतेचा संदेश”, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीने रॅलीतील सहभागी नागरिकांसाठी चहा व पाणी वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत पक्ष पदाधिकाऱ्यांनी या उत्वासात सक्रिय सहभाग नोंदविला.

यावेळी कार्यक्रमात जिल्हा उपप्रमुख अजय टप, शहर उपप्रमुख बलराम बावस्कर, गणेश खर्चे, विनायक बोरले, संजय रावणकर, अशोक गाढवे, गणेश बावस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुकरण करून समाजसेवा आणि स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या जयंती सोहळ्यामुळे मलकापूर शहरात सामाजिक एकात्मता, प्रेरणा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या कार्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे.



