राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटण्याची चिन्हे?
"चिखला" प्रकरणावरून रणकंदन; ३७ जणांवर गुन्हे; आजवर २१ आरोपी अटकेत

बुलढाणा, (प्रतिनिधी): लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. या प्रकरणात एका महिलेचे कपडे फाटेपर्यंत तिला मारहाण झाल्याचा आरोप झाल्याने खळबळ माजलेली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३७ जणांवर गुन्हे दाखल केले असून मुख्य आरोपी सरपंच गणेश काकड यांच्यासह २१ जणांना अटक देखील करण्यात आली आहे. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान आणि छत्रपती शिवरायांचे आजोळ असलेल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील आणि विनोद वाघ
चिखला (ता.लोणार जि.बुलढाणा) गावात ३ फेब्रुवारी रोजी गावातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा बसवला होता. सदर जागा गावातील सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ही एकमेव जागा असून सुरक्षेच्या कारणास्तव पुतळा तिथे नसावा, अशी भूमिका गावातील एका गटाने घेतली होती. त्यामुळे २० फेब्रुवारी रोजी हा वाद विकोपाला गेला. पुतळा हटवण्यावरून दोन गट आमने-सामने येऊन त्याचे रूपांतर लाथा-बुक्क्यांच्या हाणामारीत झाले होते.
दरम्यान, वादात आणि हाणामारीत संजीवनी वाघ नामक महिलेला अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. नव्हेतर या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील सरपंच गणेश काकड हेच या घटनेचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत ३७ जणांवर गुन्हे दाखल करून सरपंच गणेश काकड यांच्यासह २१ जणांना अटक केली आहे. घडलेली घटना केवळ पुतळ्याचा वाद होता, वैयक्तिक वैमनस्य होते की यामागे काही राजकीय समीकरणे आहेत, याचा पोलिसांनी बारकाईने शोध घेण्याची गरज आहे. सोबतच ज्या जिल्ह्यात महिलांना सन्मान दिला जातो, त्याच जिल्ह्यात अशा प्रकारची घटना घडणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला निश्चितच काळीमा फासणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वादात महिलांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २१ फेब्रुवारी रोजी चिखला काकड गाव गाठून पीडित कुटुंबांची भेट घेतली होती. “ज्यांनी आमच्या आया-बहिणींवर हात टाकला, त्यांना सरकार पाठीशी घालत असेल तर गाठ माझ्याशी आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले. सोबतच गुन्ह्यातील सर्व दोषींवर कडक कलमे लावून त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत अटक न केल्यास २५ फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देत ज्या जागेवर शिवरायांचा पुतळा स्थापित झाला आहे, तो तिथून हलवण्याला जरांगे यांनी तीव्र विरोध दर्शवला असून तो तिथेच राहिला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती.
ओबीसी समाजाचा पलटवार
दरम्यान, ओबीसी समाजाने आज घेतलेल्या सत्यशोधन मेळाव्यातून सर्व आरोप फेटाळून लावत झालेली मारहाण पुरुषांनी केलेली नसून महिलांमधील अंतर्गत वाद आहे. एका विशिष्ट समाजाला बदनाम करण्यासाठी हा प्रकार चुकीच्या पद्धतीने मांडला जात असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी मेळाव्यातून केला असून निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करू नका आणि दुसऱ्या गटाचीही तक्रार घेऊन कारवाई करा, अन्यथा लाखोंच्या संख्येने ओबीसी सभा घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. दोन्ही नेत्यांच्या या इशाऱ्यांमुळे आता या प्रकरणाला जातीय वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



