
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात येणाऱ्या रोहीणखेड येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे भरवस्तीतून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे मोताळा तालुक्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दिलीप सावळे यांच्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलीच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहे.
रोहीणखेड (ता.मोताळा) येथील रहिवासी असलेले दिलीप सावळे यांची मुलगी श्रुतीका दिलीप सावळे (वय १७ वर्षे) ही २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून शेजारीच राहणारे नातेवाईक पुंडलीक सावळे यांच्याकडे जेवण करण्यासाठी जात आहे, असे सांगून घरातून बाहेर पडली. घराच्या शेजारीच जात असल्याने पालकांनीही तिला आनंदाने पाठवले. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. काही वेळानंतर पुंडलीक सावळे यांची पत्नी ज्योतीबाई सावळे या दिलीप सावळे यांच्या घरी आल्या आणि श्रुतीका जेवायला का आली नाही?, असे विचारले. हे शब्द कानावर पडताच सावळे कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. अर्ध्या तासापूर्वी घरून निघालेली आपली मुलगी नातेवाईकांकडे पोहोचली नसल्याने त्याच्या डोक्यात विविध प्रश्नांचा काहूर माजला. दिलीप सावळे आणि कुटुंबीयांनी संपूर्ण गाव पिंजून काढले. नातेवाईकांकडे फोन केले, मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली, मात्र श्रुतीकाचा कुठेही पत्ता लागला नाही. रोहीणखेड गावात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. हताश झालेल्या दिलीप सावळे यांनी धामणगाव बढे पोलीस स्टेशन गाठून मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली.
धामणगाव पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास गजानन पाटील हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्रे फिरवली असून लवकरच श्रुतिकाचा शोध घेऊन तिला कुटुंबियांच्या स्वाधीन करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.



