क्राईम जगत
तारापूरमध्ये घरात घुसून महिलेच्या विनयभंग
संगनमत करून जीवे मारण्याची धमकीही दिली; बुलढाणा ग्रामीण पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तारापूर (ता.जि.बुलडाणा) येथे एका नराधम आरोपीने शेजारीच राहणाऱ्या एका २४ वर्षीय विवाहितेला घरात एकटे पाहून तिच्या घरात प्रवेश केला. नव्हेतर तिचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिली. माणुसकीला काळिमा फासणारी ही संतापजनक घटना नुकतीच समोर आली. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
तारापूर (ता.जि.बुलडाणा) येथील रहिवासी असलेली २४ वर्षीय विवाहित महिला २३ फेब्रुवारीच्या सकाळी १० वाजता आपल्या घरात होती. सदर महिलेला घरात एकटे बघून शेजारी राहणाऱ्या आरोपी आश्विन गोविंद चव्हाण याने अनधिकृतपणे महिलेच्या घरात प्रवेश केला. पीडितेसोबत झटापट करून वाईट उद्देशाने तिचा विनयभंग केला. या झटापटीत पीडितेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र तुटून खाली पडल्याने सुमारे ४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. पीडितेने आरोपीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी आश्विन चव्हाण याच्यासह सुंदरबाई गोविंद चव्हाण आणि गोविंद गण्यानसिंग चव्हाण यांनी संगनमत करून पीडितेस अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच या बाबत कोणाला काही सांगितले, तर याद राख, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. महिलेला घरात एकटे पाहून भरदिवसा घरात घुसून तिचा विनयभंग झाल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रकारामुळे तारापूरमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याप्रकरणी पीडित महिलेने बुलडाणा ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३, ११५(२), ३५१(२), ३५२, ३२४(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार राजू सोनोने हे करीत आहेत.



